‘साहेब, तुमच्या पाया पडतो; पण एक वेळ सोडा हो...’ 

karwai
karwai
Updated on

हिंगोली ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरासह जिल्ह्यात लॉकडाउन सुरू आहे. तरीदेखील नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण फिरत असल्याचे आढळले. सोमवारी (ता. ११) पोलिस पथकाने कारवाई करून शहर पोलिस ठाण्यात या सर्वांना आणले असता नागरिकांनी टाहो फोडत ‘साहेब, ‘तुमच्या पाया पडतो. परंतु, एक वेळ माफ करा’ अशी विनवणी केली.


जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, महसूल, पालिका प्रशासन वेळोवेळी सांगत आहे. अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडा, अन्यथा विनाकारण बाहेर पडू नये. घरी थांबा, प्रशासनाला सहकार्य करा, असे सांगूनदेखील काही महाभाग सकाळी मॉर्निंग वॉक, तर संध्याकाळी इव्हिनिंग वॉकचे कारण पुढे करीत घराबाहेर पडत आहेत. अनेक वेळा मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दम देऊन दंड आकारून सोडून दिले. तरी परत परत नागरिक पुन्हा त्याच चुका करून कोरोनाला आमंत्रित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

२० ते २५ युवक, नागरिक फिरताना आढळले
यापूर्वी शहर पोलिस व पालिका कर्मचारी पथकाने अनेक विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली. उठाबशा काढायला लावल्या, दंड आकारल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊनदेखील नागरिकांना शहाणपण का येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोमवारी आदर्श कॉलेज क्रीडा मैदानावर सकाळी सहाच्या सुमारास अनेक नागरिक मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक शेख सय्यद, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन केनेकर यांच्यासह पालिका कर्मचारी विनय साहू, दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मैदानाकडे धाव घेतली असता त्या ठिकाणी २० ते २५ युवक, नागरिक फिरताना आढळून आले.

३२ नागरिकांना सहा हजार चारशेचा दंड
या पथकाने ताब्यात घेत लॉकडाउन असताना तुम्ही विनाकारण का फिरता, असा जाब विचारताच नागरिकांची भंबेरी उडाली. ‘साहेब, तुमच्या पाया पडतो; पण आम्हाला एकदा माफ करा’ अशी विनवणी ते नागरिक करू लागले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी फिरणाऱ्या ३२ नागरिकांकडून सहा हजार चारशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आणि त्यांना सोडून देण्यात आले. पुन्हा असे फिरताना दिसल्यास ‘जेल’मध्ये टाकू, अशी तंबी दिली. तर काही जाणांनी पोलिस धरपकड करत असताना कोलांटउड्या मारल्या व काहीजण पळत सुटले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.