Hingoli News: येथील रेल्वेस्थानक रोड भागातील कुलस्वामिनी महिला अर्बन क्रेडिट पतसंस्थेत संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने नातेवाइकांच्या नावे विनातारण कर्जवाटप करून १० कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बुधवारी ता. सहा रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ११ महिलांसह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली शहरातील रेल्वेस्थानक रोड भागात कुलस्वामिनी महिला अर्बन क्रेडिट पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळांवर ११ महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पतसंस्थेमार्फत ग्राहकांना आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेण्यात आल्या आहेत. ठेवीदारांना फिक्स डिपॉझिट, मंथली डिपॉझिट, रिइन्व्हेस्टमेंट डिपॉझिट, मंथली रिकरिंग डिपॉझिटवर इतर पतसंस्थेच्या तुलनेत जादा म्हणजेच १० ते १३ टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवले.
या पतसंस्थेच्या विश्वासावर ४,८१० ग्राहकांनी १०.६८ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र पतसंस्थेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने नातेवाईक, हितसंबंधातील व्यक्तीच्या नावे ता. १६ डिसेंबर २०२२ ते ता. २९ नोव्हेंबर २३ या कालावधीत नियमबाह्य पध्दतीने विनातारण कर्ज वाटप केले.
तसेच कॅश क्रेडिट खाते, अँडव्हान्स अकाउंट तर इतर अकाउंटद्वारे रकमांची उचल करून संस्थेतील ठेवीदारांच्या १०.६८ कोटी रुपयांच्या जमा रकमेची आर्थिक फसवणूक करून अपहार केल्याचे सनदी लेखापालाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले.
या प्रकरणी सनदी लेखापाल संजय जाजू (नांदेड) यांनी बुधवारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा अर्चना कैलास खर्जुले, उपाध्यक्ष त्रिवेणी धर्मेंद्र खर्जुले, सचिव सारिका बजरंग खर्जुले,
संचालिका वर्षा भारतभूषण अग्रवाल, अंजू सुधीर कटके, मीनाक्षी भगवान गुंजकर, सिया राहुल चंदनानी, बेबी प्यारेवाले, शितल मंगेश लोलगे, अलका संतोष खंदारे, गायत्री गणेश महामुने.यांच्यासह कैलास जगन्नाथ खर्जुले, बजरंग जगन्नाथ खर्जुले,
पतसंस्थेचे व्यवस्थापक गणेश धोंड,पासिंग अधिकारी शिरीष जहागीरदार, रोखपाल अक्षय निलजेवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.