Latest Rain Update: बऱ्याच खंडानंतर मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला. आतापर्यंत सरासरीच्या ४८१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला आहे, तर मॉन्सूनच्या काळात वीज पडून तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे; तसेच ४७२ पशुधन दगावले आहे.
यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र, मराठवाड्यात मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यातही पावसाचा जोर फारसा नसल्याने चिंतेचे वातावरण होते. काही दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. विभागात सर्वदूर पाऊस पडू लागला आहे.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ५.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जून ते १९ ऑगस्टदरम्यान ४८१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३३ टक्के पावसाची नोंद बीड जिल्ह्यात झाली, तर सर्वात कमी ९३.५ पावसाची नोंद हिंगोली जिल्ह्यात झाली. गतवर्षी याच काळात ३५४.३ म्हणजे केवळ ८० टक्के पावसाची नोंद झाली होती.
१ जून ते १९ ऑगस्टदरम्यान वीज पडून विभागात ३३ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ जण लातूर जिल्ह्यातील आहेत; तसेच लहान-मोठी ४७२ जनावरे दगावली. सहा घरांची पडझड, तर पक्क्या असणाऱ्या १४९ घरांची अंशतः पडझड झाली. लातूर जिल्ह्यातील ९२२ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.