मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून आंदोलने केली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या (२४ डिसेंबर) रोजी संपणार आहे. यापूर्वी त्यांची मराठवाड्यातील बीड येथे जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. या इशारा सभेत जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सभेपूर्वीच बीड शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून मधुकर खंडेराव शिंगण असे जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राम राम... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सभेची जय्यत तयारी
दरम्यान शनिवारी (ता. २३) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेची संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या घटना व सभेची संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस दलही सतर्क झाले आहे. सभेसाठी ५५ अधिकाऱ्यांसह दीड हजारांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रवासी वाहतूक सुरू; जड वाहने वळविणार
सभा धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर होत आहे. त्यामुळे या मार्गावरुन होणारी जड वाहतूक वळविण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर- बीड- धाराशिव, धाराशिव- बीड- जालना, धाराशिव- बीड- छत्रपती संभाजीनगर, जालना- बीड- अहमदनगर, माजलगाव- बीड- धाराशिव व परळी- बीड या मार्गावरुन होणारी जड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या परीक्षा व इतर कामांत अडचणी येऊ नयेत, यासाठी परिवहन महामंडळाच्या बस व छोटी प्रवासी वाहने सुरु ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासन व संयोजकांच्या बैठकीत घेण्यात आला.
५५ अधिकारी, १५०० पोलिस कार्यरत
सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलानेही तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिस अधीक्षकांसह दोन अप्पर पोलिस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी असे ५५ पोलिस अधिकारी, ७०० पोलिस, तसेच राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या व वाहतूक शाखेचे १२५ कर्मचारी व ६०० होमगार्ड सभेच्या बंदोबस्तासाठी तैनात असतील. सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. सभेवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांसह १० सीसीटीव्हींची नजर असेल. याच काळात पोलिसांनी ४०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.