उमरगा - पावसाळा ऐन तोंडावर आल्याने जोरदार पावसाचा नेम सांगता येत नाही. नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत पालिकेने शहरातील विविध भागात तुंबलेल्या नालीच्या सफाई काम सुरू केले आहे. उमरगा शहरात मुख्य नालीचे बांधकाम व्यवस्थित नसल्याने पाण्याला योग्य दिशा मिळत नाही. यंदा पालिका प्रशासनाने शहरातील विविध भागातील नाले, रस्त्याची पाहणी करून पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठीचे नियोजन सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या भारत शिक्षण संस्थेच्या कॉम्पलेक्स ते भारत विद्यालयापर्यंतची तुंबलेल्या नालीची सफाई करण्यात आली. शहरातील विविध भागात असलेल्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई करणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या संस्थेच्या कामगारामार्फत ही काम केली जात असून ज्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या ठिकाणी साचलेली घाण काढण्यात येत आहे. काढलेली घाण लागलीच ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात येत आहे. दरम्यान आरोग्यनगरीच्या बाजुला असलेले मोठा नाला, एकोंडी रोड भागातील नाला, मुळजरोड भागातील नाला, पतंगे रोड, काळे प्लॉट आदी भागात स्वच्छतेची कामे जलद गतीने पूर्ण करण्याची गरज आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, प्रभारी आरोग्य निरीक्षक तुळशीदास वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची काम पूर्ण करण्याला गती देण्यात येत आहे.
वस्तीत शिरणारे पाणी रोखण्यासाठी हव्यात उपाययोजना
अतिवृष्टीने बॅंक कॉलनी, एकोंडी रोड, मुन्शी प्लॉट, मदनानंद कॉलनी तसेच दत्त मंदिर परिसर, शेंडगे-बेडदुर्गे हॉस्पिटल परिसरात यापूर्वी दोन पावसाळ्यात पाणी शिरले होते. परंतू अजुनही दोन-तीन वर्षात या भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला गेला नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. हुतात्मा स्मारकाच्या पलीकडेच्या भागात दोन्ही बाजूंनी नाल्या बांधलेल्या नाहीत. नाली बांधकामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असल्याची माहिती पालिका प्रशासन सांगते. राष्ट्रीय महामार्ग विभागाला मात्र याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसते. परिणामी अतिवृष्टी झाली की दत्त मंदिर परिसरासह राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली जातो. त्या वेळी प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना केली जाते. पुन्हा पावसाळ्यात जैसे थै स्थिती असते.
दत्त मंदिरापासून शेंडगे हॉस्पिटलपर्यंत, त्याचप्रमाणे विरूद्ध बाजूंनीही नाली बांधकाम नसल्याने पाऊस जास्त झाला की, पाणी रस्त्यावर येते. नाली बांधकामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील मुख्य नालीतील गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून सध्या टप्प्याटप्याने नाली सफाईचे काम सुरु आहे.
- रामकृष्ण जाधवर, प्रशासक, तथा मुख्याधिकारी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.