हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून स्वच्छ हात धुण्याच्या विविध सहापद्धतीचे प्रात्यक्षिक गुरुवारी (ता. १९) जिल्हा परिषदेत दाखविण्यात आले. हात स्वच्छ धुतल्यानंतरच सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या इमारतीत प्रवेश देण्यात आला. यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रारंभी गुरुवारी जिल्हा परिषदेचे सीईओ आर. बी. शर्मा यांनी इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व विभागप्रमुखांच्या हातावर
सॅनिटायझरचे दोन थेंब टाकून हात धुण्याच्या सहा पद्धती सांगितल्या. त्यानंतर प्रशांत तुपकरी यांनीही प्रात्यक्षिक दाखविले.
हेही वाचा - हिंगोलीच्या बस, रेल्वेस्थानकात शुकशुकाट
दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धुतले हात
जवळपास दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात धुऊन जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला. आता ही मोहीम आरोग्य विभागाच्या वतीने दररोज राबविण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, पंचायत विभागाचे नितीन दाताळ, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, गणेश वाघ, डॉ. गणेश जोगदंड, शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, प्रशांत तुपकरी, शंकर पारडकर आदींची उपस्थिती होती. या वेळी सर्व विभाग प्रमुख, पदाधिकाऱ्यांचा दालनात सानिटायझर बॉटल ठेवण्यात आली असून कोरोना विषाणू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या भिंतींवर पोस्टर लावण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
हिंगोली: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असताना आरोग्य विभागाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
दोन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून दोन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. यात आयसोलेशन वॉर्ड, क्वारांटाइन आयसोलेशन वॉर्ड हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. तर कोरोन्टाईन कक्षाची लिंबाळा परिसरातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात १०० बेड; तर अन्य ठिकाणी २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी बाहेर देशातून येणाऱ्या संशयित रुग्णांना ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. कोरोना विषाणू पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून गाव पातळीवर ग्रामसेवक, आशा वर्कर यांच्या मार्फत बाहेर राज्यातून किंवा परराष्ट्रातून आलेल्या नागरिकांची यादी तयार केली जात आहे.
येथे क्लिक करा- हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट एक जण जखमी
आतापर्यंत एक हजार ९३ जणांची नोंद
आतापर्यंत एक हजार ९३ जणांची नोंद केली आहे. या नागरिकांची डॉक्टरांकडून तपासणी करून आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल केले जात आहे. कोरोना विषाणूची भीती टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मुख्य ठिकाणी बॅनर, पोस्टर लावणे, परिवर्तन एक्स्प्रेसच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, हात स्वछ धुवावेत, नागरिकांनी काळजी घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
स्पीकरवरून कोरोनाबाबत जनजागृती
सोशल मीडियावर कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, कोणत्याही अफवेला नागरिकांनी बळी पडू नये, वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनावर प्रतिबंध होईल. शहरात पालिका प्रशासाने घंटागाडीच्या माध्यमातून स्पीकरवरून सकाळीच कोरोनाबाबत जनजागृती करणे सुरू केले आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, आरोग्य यंत्रणा यासह गावपातळीवर ग्रामसेवक, आशा वर्करच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच गावपातळीवर कामानिमित बाहेरगावांवरून परत येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.