नांदेड : आंतरमनातील भावना जेंव्हा अनावर होतात तेव्हा आपसूकच अश्रुंचे पाट वाहू लागतात. सुमारे साडेतीन दशकाच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच सीता खंडी येथील आदिवासी आश्रम शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम झाला. भोकर नजीक असलेल्या सीता खंडी या निसर्गरम्य परिसरातील महादेव मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. ‘भेटी लागे जीवा, लागलिया आस’ या ओवी प्रमाणे भेटीसाठी आतुर झालेले गुरु शिष्य यांच्या गळा भेटी होताच सीता खंडी परिसर गहिवरून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कृतज्ञताभाव जपण्यासाठी कार्यक्रम
गुरुपुजन तथा गुरुवर्य यांच्या सपत्नीक सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुजनांच्या अमृततुल्य शिकवणीमूळे कर्तबगार व्यक्तिमत्त्व घडले गेले आणि म्हणूनच विविध क्षेत्रामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थी मोठ मोठ्या पदांवर शासकीय जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. हे ऋण कदापिही विसरणे शक्य नाही; म्हणून तो कृतज्ञताभाव जपला पाहिजे या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती विलास गारोळे यांनी प्रास्ताविकेतून दिली.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना उषाताई करडीले म्हणाल्या की ,आपल्या कमाईतला एक हिस्सा उपकाराची परतफेड करण्यासाठी खर्ची घातला पाहिजे तर दुसरा शिक्षणावरती तर तिसरा आपला चरितार्थ चालवण्यासाठी खर्च केला पाहिजे आणि उर्वरित चौथा परमार्थासाठी अर्थात दानधर्म यासाठी खर्च करून आपला आयुष्य सार्थकी लावलं पाहिजे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून स्वतः भरपुर शिकलं पाहिजे आणि आपल्या पाल्यांना शिकवले पाहिजे. हे स्पर्धेचे युग असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
गुरुंच्या प्रति व्यक्त केले ऋणानुबंध
पंचफुला भुरके यांनी ‘‘गुरु शिष्य नाते व ऋणानुबंध चिरकाल जोपासले पाहिजे. ज्यामुळे भावी पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल’’, असा विश्वास व्यक्त केला. मारुती गारोळे, गुणाजी फोपसे, रामचंद्र मुरमुरे, देविदास मुरुमुरे, आनंदा नागलवाड, हरिश्चंद्र गारोळे, सुभाष धनवे आणि हनुमंत वागतकर इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गुरूंच्या प्रति ऋणानुबंध व्यक्त केले. अर्जुन पाईकराव गुरुजी यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना शाल व श्रीफळ देऊन आपला प्रेम भाव व्यक्त केला.
हेही वाचायलाच पाहिजे - आम्हाला परीक्षेत यश मिळवणे झाले सुलभ ; असं कोण म्हटलं, ते वाचाच
गुरुजनांची सपत्निक उपस्थिती
कारभारी करडीले, माधवराव मल्लेवार, खंडेराव वड्डे, दशरथ रायकवाड, बाबाराव पिलंगवाड व बनसोडे गुरुजी हे सर्व गुरुजनांनी सपत्निक उपस्थित राहून ‘याची देही याची डोळा’ या अविस्मरणीय अशा विद्यार्थ्यांच्या अनमोल प्रेमाची अनुभूती घेतली. पस्तीस वर्षाच्या कालखंडानंतर विद्यार्थ्यांचे अनमोल प्रेम पाहून सर्व गुरुजन वर्ग अक्षरशः भारावून गेले होते. १९६९ ते १९९४ या 35 वर्षांच्या कालावधीतीत शिक्षण घेतलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. स्नेह भोजनानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.