४५ कोटींच्या माकणी- औसा पाणीपुरवठा योजनेचा ऑनलाइन शुभारंभ
औसा (लातूर): दीड हजार वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या औसा शहराच्या विकासासाठी जितका निधी लागेल तो दिला जाईल. ३५ किलोमीटर लांबीच्या ५४ कोटी खर्च करून होत असलेली माकणी-औसा पाणीपुरवठा योजना ही औसेकरांची कायमची तहान भागविणारी असून औसा हे मराठवाड्यातील एक विकसित शहर म्हणून नावारूपाला यावे यासाठी जी मदत लागेल ती आम्ही करू. औशातील लोकांचे आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे आणि अतूट नाते आहे. सुदैवाने नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या रूपाने शहराच्या विकासासाठी झटणारा आणि त्यासाठी धडपड करणारा माणूस लाभला असल्याने शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी (ता.१९) माकणी-औसा पाणी पुरवठा योजनेचा आणि शहरातील इतर विकास कामाच्या ऑनलाइन लोकपर्ण सोहळ्यात बोलत होते.
प्रारंभी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी औशासाठी केलेल्या मदतीची व त्यांनी दिलेल्या निधींचा वापर कसा आणि कुठे केला याची माहिती दिली. यावेळी शहरवाशीयांसी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, औसा शहराला दीड हजार वर्षांची धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर मराठवाड्यातील महत्वाचे शहर असल्याने शहराच्या विकासासाठी कामे करतांना पुढील पन्नास, शंभर वर्षाचा विचार करून कामे करावीत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत वेळेवर पाणीपट्टी, वीजबिल भरले पाहिजे. राज्यातील इतर शहरे विकासकामांना कशा पद्धतीने करतात याचा अभ्यास केला जावा. झाडे लावून शहर हरित करण्याबरोबरच वातावरण चांगले होऊन मुबलक ऑक्सिजन उपलब्ध होईल. शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी पालिके बरोबरच नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आणि यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.
तालुक्यात बऱ्याच गोष्टी ऐतिहासिक आहेत त्याचे जतन करून पर्यटनाला चालना दिली जावी. विविध उद्योग, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. लहान शहरे जर समृद्ध बनली तर मोठ्या शहराकडे जाणारा लोंढा थांबून बकालपणा कमी होण्यास मदत होईल. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने औशात आल्यावर मला औसेकरांचा उत्साह दिसून आला होता. आता औसा विकसित होत असल्याचे पाहून मनस्वी समाधान होत आहे. आम्ही दिलेल्या निधीचा जर योग्य पद्धतीने विनियोग केला गेला तर नक्कीच औसा विकासाच्या वेगळ्या मार्गावर येईल आणि निधीचा योग्य वापर झाल्याचे आम्हालाही समाधान लाभेल असेही ते म्हणाले. औशासाठी निधीची कसलीच कमतरता भासू देणार नसल्याचा पुनरुच्चार पवार यांनी यावेळी केला.
....नगराध्यक्ष डॉ. शेख धडपड्या माणूस..
शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष डॉ. शेख हे किती धडपड करतात हे मी नेहमी पाहतो. वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेणे, त्यांच्यापुढे कामाची मांडणी करणे, माझ्याकडे अडचणी सांगून निधी दिलाच पाहिजे असे हट्टाने सांगणे, सारखे मेसेज, फोनवरून संपर्कात राहणे या गोष्टींबरोबरच त्यांची धडपड ही वाखाणण्याजोगी आहे. एका चांगल्या लोकप्रतिनिधीने कामासाठी सतत पाठपुरावा केला पाहिजे आणि डॉ. शेख यांच्यात मला एक चांगला लोकप्रतिनिधी दिसत असल्याची शाबासकी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.