नांदेड : संचारबंदीने काळ्या बाजारात मद्य विक्री जोरात सुरु आहे. साधारण एक हजार ३०० रुपयांच्या बाटलीला तीन हजार ५०० रुपये मोजले जात आहेत. दारुसाठी हवी तेवढी रक्कम मोजून वेगवेगळ्या ठिकाणच्या बारमधून बेवडे दारू खरेदी करतानाचे चित्र संचारबंदीच्या काळात दिसून येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात वाईन बारच्याही दुकानांचे समावेश असून, तळीरामांची चांगलीच पंचाईत होत आहे. हे तळीराम संचारबंदी असतानाही दारुच्या शोधात सैरभैर फिरत असल्याचे चित्र सध्या शहरातील गल्लीबोळांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाट्टेल ती किंमत दारुसाठी मोजली जात असून, हातभट्टीचा धंदाही तेजीत सुरु असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.
चौपट दराने होतेय दारु विक्री
राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस कितीही लक्ष ठेवून असले तरी त्यांचा डोळा चुकवून चौपट दराने दारुची विक्री सर्रास सुरु आहे. प्रमुख कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या किमान चौपट दराने विकल्या जात आहेत. वाइन शाॅपमध्ये साडेतीन हजार रुपयांना मिळणारी बाटली आज बारा हजार रुपयांना विकली जात आहे. साधारणपणे ६०० ते एक हजार ३०० रुपयांना मिळणाऱ्या दारुच्या बाटल्या दीड हजारापासून साडेचार हजार रुपये किंमतीला मिळत आहेत. विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बारमधील मंडळी करताना दिसतात. त्यातही बाहेरून बनावट दारू वेगवेगळ्या कसरती व करामती करून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले.
हे वाचाच - ‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण रद्द
अशी वापरली जातेय शक्कल
एका ठिकाणी रिकाम्या गॅस सिलिंडरचा तळ कापून त्यामध्ये दारुच्या बाटल्या लपवून आणल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल होते आहे. त्यामुळे तळीरामांची दारुची गरज भागविण्यासाठी कशा कसरती सुरु आहे ते दिसून येते. लॉक डाऊनच्या काळात सर्व वाहतूक व्यवस्था देखील बंद करण्यात आली होती. परंतु, आता सरकारने शेतमाल, अंडी, मांस आदींच्या विक्री व वाहतुकीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे बेकायदेशीर दारू वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.
येथे क्लिक करा - शिक्षण क्षेत्रातील डबल गेम कुणाच्या फायद्याचा?
सिगारेट, तंबाखुचीही दरवाढ
दारू बरोबरच सिगारेट व तंबाखुची विक्री मागच्या दाराने जोरात सुरु आहे. २०० ते ४०० रुपयांना सिगारेटचे एक पाकीट विकले जात आहे. तर तंबाखुची सात रुपयाला मिळणारी पुडी शहरी भागात ३० ते ४० रुपयांना विकली जात आहे. पोलिस बंदोबस्तात अडकल्याचे लक्षात घेऊन जागोजागी स्थानिक झोपडपट्टीतील दादांनी तसेच ग्रामीण भागात हातभट्टी बनविण्याचे काम शहर व परिसरामध्ये जोरात सुरु झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.