अंबड - अधिकारी व्हायचेच या जिद्दीसह स्पर्धा परीक्षा दिल्या, आधी पोलिस उपनिरीक्षक, मग जिल्हा उपनिबंधक, त्यानंतर नायब तहसीलदार आणि आता पोलिस उपअधीक्षकपदाला गवसणी घातली. अभ्यास, अथक परिश्रम आणि जिद्द बाळगत वाटचाल करणाऱ्या बदापूर येथील शिवप्रसाद नानासाहेब पारवे यांनी युवापिढीसमोर आदर्श ठेवला आहे.
अंबड तालुक्यामधील बदापूर या छोट्याशा गावातील शिवप्रसाद नानासाहेब पारवे (वय ३०) रहिवासी. वडील नानासाहेब हे अल्पशिक्षित. त्यांचा गावात शेतीसोबतच एक छोटासा व्यवसाय आहे. आई सुशीला, वडील आणि भाऊ नवनाथ असे शिवप्रसाद यांचे छोटेखानी कुटुंब. मुलांनी शिक्षण घ्यावे असा त्यांच्या वडिलांचा आग्रह. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात शिवप्रसाद आणि नवनाथ या भावंडांना त्यांनी शिक्षणासाठी ठेवले.
नवनाथ यांनी यथावकाश शिक्षण पूर्ण करत पोलिस भरतीची तयारी केली. ते शहरात पोलिस दलात नोकरीलाही लागले. शिक्षण सुरू असताना आपणही भावासारखे पोलिस दलात जावे, अधिकारी व्हावे, असे शिवप्रसाद यांचे स्वप्न. देवगिरी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वर्ष २०१४ पासून मेहनत, जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीला ते पोलिस उपनिरीक्षक झाले.
ता. एक डिसेंबर २०१९ पासून सलग दीड वर्षे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक कर्तव्य बजावले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षा दिली. त्यात यशस्वी होत ते जिल्हा उपनिबंधक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी वर्ष २०२० ते २०२१ बुलडाणा येथे नायब तहसीलदारपदावर कार्य केले.
एवढ्यावरच समाधानी न राहता प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा २०२२ ला लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा दिली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२३ ला मुलाखत झाली. त्यात पोलिस अधीक्षकपदासाठी ते यशस्वी ठरले.
आता सप्टेंबरपर्यंत त्यांचे प्रशिक्षण होईल. त्यानंतर पोलिस अधीक्षक म्हणून शिवप्रसाद पारवे कर्तव्य बजावणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपअधीक्षक अशी मजल त्यांनी गाठली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यश अपयश हे आपल्या मेहनत व चिकाटीवर अवलंबून असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवावी. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. अथक परिश्रम व जिद्दीच्या बळावर काहीही होऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शकाची खरी गरज आहे.प्रचंड मेहनत घेतल्यास यश आपल्यापासून फार दूर नाही.
- शिवप्रसाद पारवे, युवक, बदापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.