कोरोना काळात अंगणवाडीताई ठरल्या ‘सुपरहिट’

file photo
file photo
Updated on

परभणी : गरोदर मातापासून ते सहा महिन्यांच्या बाळापर्यंत अगदी आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या अंगणवाडीताई कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा ठरल्या आहेत. ऑनलाइन पूर्वप्राथमिक शिक्षणासह सकस आहार पुरवत जिल्ह्यातील ६०० बालकांना कुपोषणाच्या संकटातून बाहेर काढले आहे. एक लाख १२ हजार १८५ बालकांना आणि २१ हजार मातांना घरपोच आहार पुरविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्या कोरोना वॉरियर्स ठरल्या आहेत.
अंगणवाडीताई  या सहा वर्षांच्या आतील बालकांचे आरोग्य, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरी सक्षमीकरण कार्यक्रम, लसीकरण, कुपोषण, अनौपचारिक शिक्षण अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात. त्यांच्या कामात काळानुरूप आधुनिकता आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांना गतवर्षी एप्रिल महिन्यात स्मार्ट फोन दिले आहेत. त्यामध्ये  कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस) या ॲपच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर आणि स्तनदा मातांच्या नोंदी, बालकांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार या सर्व कामांचा लेखाजोखा ॲपमध्ये दररोज भरला जात आहे. पूर्वी या सर्व नोंदी ठेवण्यासाठी ११ प्रकारच्या नोंदवह्या सांभाळाव्या लागत होत्या. आता त्या केवळ मोबाइलमध्येच सर्व नोंदी ठेवल्या जात आहेत.

घरपोच सेवा 
सर्व काही सुरळीत असताना मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने शाळासोबत अंगणवाडी केंद्रदेखील बंद झाले. परंतु, अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम मात्र थांबले नाही. त्यांनी घरपोच सेवा देण्याचा उपक्रम राबविला. लॉकडाउन काळात लोकशिक्षण, सल्ला,  रेडी टू कूक फूडचे वाटप, घरोघरी जाऊन पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून यावर प्रबोधन करणे,  मुलांसाठी छोटे छोटे व्हिडिओ तयार करून यावर पोस्ट करणे, असे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविकांना सोपविले आहे.

जिवाची पर्वा न करता सर्वेक्षण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अंगणवाडी सेविकांना आशा, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे सोपविलेले काम जिवाची पर्वा न करता अंगणवाडी सेविकांनी पूर्ण करत मोलाचा वाटा उचलला. सर्वेक्षणासोबतच बालके आणि स्तनदा, गरोदर मातांना सकस आहार पुरविण्याची मोठी जबाबदारी  अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असल्याने त्यांनी दुहेरी जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम केले आहे. परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात एक हजार ७००, तर शहरी भागात १३४ अंगणवाडी केंद्र आहेत. तितक्याच सेविका आणि मदतनिसांनी कोरोना काळात योद्धा म्हणून काम केले आहे. जिल्ह्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील ५७ हजार ७८८ बालके, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील ५४ हजार ३९७ बालके आणि २१ हजार ९०८ गरोदर, स्तनदा मातांना दोन महिने घरपोच सकस आहार पुरवला आहे.

हेही वाचा : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे द्विशतक; रविवारी आढळले सात रुग्ण

पालकांना ऑनलाइन माहिती
केंद्र बंद असल्याने घरी बालकांना कोणता आहार द्यावा, किती वेळा द्यावा याची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविका बालकांच्या पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर दररोज माहिती देत आहेत. तसेच बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडेदेखील याद्वारे दिले जात आहेत.

माझी आई अंगणवाडी ताई
लॉकडाउनपूर्वी जिल्ह्यात १२७ तीव्र कुपोषित, तर ५०० बालके मध्य कुपोषणाच्या श्रेणीत होती. कुपोषित बालकांसाठी अंगणवाडी केंद्रात विशेष बालविकास केंद्र स्थापन करून त्यांना कुपोषणातून मुक्त केले जाते. परंतु, केंद्र बंद असल्याने बालकांच्या घरीच घरगुती बालविकास केंद्र निर्माण करून त्यांच्या पालकांच्या माध्यमातन कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले. ‘माझी आई अंगणवाडी ताई’ असे नाव देत सुरू केलेल्या उपक्रमात बालकांच्या आईलाच अंगणवाडी ताई करून त्यांच्या माध्यमातून सकस आहार पुरवत जिल्ह्यातील ६०० बालके कुपोषणाच्या बाहेर आले आहेत.

महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली
जिल्ह्यातील अंगणवाडीताईंनी कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली आहे. अजूनही त्या काम करीत आहेत. सर्वेक्षण करण्याचे कामदेखील प्रामाणिकपणे पूर्ण केले आहे. बालकांना आणि मातांना घरपोच सकस आहार पुरविणे ही मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा.) जिल्हा परिषद. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.