लहान मुलांना का होतो सर्दी, खोकला, न्यूमोनिया?

हिवाळ्यात मुले अनेकदा आजारी पडतात. बदलत्या ऋतूमध्ये मुलांना सर्दी, ताप किंवा न्यूमोनियाचा धोका वाढतो.
Children Health
Children HealthSakal
Updated on

हिवाळ्यात मुले अनेकदा आजारी पडतात. बदलत्या ऋतूमध्ये मुलांना सर्दी, ताप किंवा न्यूमोनियाचा धोका वाढतो. हिवाळ्यात व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे मुलांना अनेकदा न्यूमोनिया होतो. पण संसर्ग टाळण्यासाठी पूरेपूर काळजी घेण्याची गरज असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा शेरकर यांनी व्यक्त केले.

मुले आणि सभोवतालचे वातावरण यांचा निकटचा संबंध असतो. हिवाळ्यात हवा थंड व कोरडी होते. या काळात नाकातील, घशातील जागा कोरडी झाल्याने जंतूसंसर्ग थेट नाकातून, घशातून फुफ्फुसात प्रवेश करतो. त्यामुळे मग सर्दी, ताप, खोकला, खोकल्यातून कफ होतो, त्यानंतर मात्र काळजी योग्य औषधोपचार न घेतल्यास न्यूमोनियाचा धोका वाढतो. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव दिसून येतो.

वारंवार नाकातोंडाला स्पर्श करणे खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवणे किंवा रुमाल न वापरणे, स्वच्छ हात धुण्याचाही अभाव मुलांमध्ये अधिक असतो. हिवाळ्यात घरांची दारे-खिडक्या बऱ्यापैकी बंद ठेवण्याकडे कल असल्याने एक जण आजारी पडला तर दुसऱ्यालाही जंतूची लागण होते. बहुतांश वेळा घरातील सर्वच सदस्य एकापाठोपाठ आजारी पडतात. थंडीत चयापचयाची क्रिया मंदावते, रक्ताभिसरण कमी होते हे आरोग्याला अपायकारक असते. हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होते, हेही एक आजारी पडण्याचे कारण आहे.

हिवाळ्यातील मुलांचे आजार

सर्दी, खोकला, सौम्य किंवा तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, कान दुखणे, चिडचिडेपणा वाढणे यालाच फ्लू असे संबोधले जाते. हा विषाणूजन्य आजार आहे. मुलांच्या किंवा बाळाच्या प्रतिकारशक्तीनुसार लक्षणे कमी अधिक असतात याला औषधोपचाराची फार गरज नसते, मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.

न्यूमोनियाचा संसर्ग

न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे, ज्यामुळे वायुमार्गात अडथळा येतो. या आजारात फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांमध्ये द्रव्य भरल्यामुळे सूज येते. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीस खोकला, कफ आणि तापाचा त्रास होऊ लागतो. या समस्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त उद्भवतात.

मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे

न्यूमोनियाची बहुतेक लक्षणे फ्लू सारखीच असतात. हे सौम्य किंवा गंभीर असू शकते. हा आजार जिवाणू, विषाणू आणि बुरशीमुळे होऊ शकतो. काही सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ तयार होणे, थकवा (थकवा) आणि छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकताना छाती आणि घशात दुखणे यांचा समावेश होतो.

अशी घ्या काळजी

फ्लू हा विषाणूजन्य आजार पाच वर्षाखालील मुलांमध्ये वर्षभरात साधारण सात ते आठ वेळा दिसून येतो. सौम्य सर्दी, खोकला हा घरीच हळद, सुंठ, ओवा याचा वापर करून बरा होतो. जास्त ताप असल्यास पॅरासिटामॉल देवू शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेणे अधिक चांगले आहे.

आहारावर लक्ष आवश्यक

लहान बाळाला उबदार जागेत ठेवावे, भरपूर जलपेय, गरम तांदळाची, मुगाची पेज, भाज्यांचा रस, वरण-भात, मऊ खिचडी, फळांचा रस आणि कोमट पाणी भरवत राहण्याची गरज आहे. हिवाळ्यात दोन ते पाच वयोगटातील मुलांना आहारात प्रामुख्याने प्रथिने म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंडी, डाळी, खिचडी, उपमा, इडली, डोसा, कडधान्य, सुकामेवा यांचा समावेश करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ ऊर्जा देतात म्हणून सुकामेवा, तिळाचे, गुळाचे, डिंकाचे लाडू, तुपातील शिरा, लोणी, लापसी, बेदाने, शेंगदाण्याचे लाडू, गाजराचा हलवा असा आहारात समावेश आवश्यक आहे.

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणून ‘क’ जीवनसत्त्वाचा वापर करावा. लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा वापर वाढवावा. जंकफुड, तळलेले वडे, सामोसे, चिप्स, कुरकुरे, बर्गर, मॅगी, चॉकलेट, आइस्क्रीम हे कटाक्षाने टाळावेत. योग्य आहार विहार आणि वेळीच औषधोपचार घेतला तर हिवाळा अल्हाददायक होऊ शकतो.

- डॉ. मंजूषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ, राज्य बालरोग संघटना सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.