औंढा नागनाथ संस्‍थानचा कारभार प्रशासकांच्या हाती

aundha nagnath photo
aundha nagnath photo
Updated on

औंढा नागनाथ (जि. हिंगोली): बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ संस्‍थानच्या विश्वस्‍त मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाल शुक्रवारी (ता. आठ) संपला. येथे आता प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आल्याची माहिती संस्‍थानचे अधीक्षक वैजनाथ पवार यांनी दिली. 

२० मे २०१५ रोजी विश्वस्त व सल्लागार सदस्य मंडळाची संयुक्त बैठक नागनाथ मंदिर सभागृहात पार पडली होती. त्यात सचिव म्हणून गजानन वाखारकर, सहसचिव म्हणून विद्या पवार यांची निवड झाली. परंतु, निवडीपासून दोन गट पडल्याने ही निवड प्रक्रिया वादात सापडली. दीड वर्षानंतर सचिव, सहसचिव दोन्ही पदे सहायक धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांनी रद्द केली. 

पाच वर्षानंतर कार्यकाळ संपुष्टात येतो

या निकालासंदर्भात सहधर्मदाय आयुक्तांकडे दाद मागण्यात आली. त्यांनी दिलेल्या निकालात सचिव पद रद्द होऊन सहसचिव पद कायम राहिले. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या घटनेनुसार पाच वर्ष झाल्यानंतर विश्वस्तांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येतो. त्याप्रमाणे मंदिरातील विश्वस्त मंडळाची बोर्डावरील नावे कमी करण्यात आल्याचे देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार यांनी सांगितले. 

नवीन विश्वस्तांच्या निवडीकडे लक्ष

आता नूतन विश्वस्त मंडळाची निवडप्रक्रिया सहायक धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या आदेशानुसार पार पाडली जाईल. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सल्लागार सदस्य आमदार संतोष बांगर व विश्वस्त सदस्य तथा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संभाजी शिंदे हे मंदिर देवस्थानचे कामकाज पाहणार आहेत. 

एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप

दरम्यान, पाच वर्ष काही विकासकामे झाली. याच कार्यकाळात एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप देखील चर्चेत आले. कोरोनाच्या संकटात मंदिर दोन महिने बंद असतानाच विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. 

कार्यवाहिसाठी काही आदेश आलेले नाहीत

घटनेनुसार विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाची मुदत संपुष्टात आली आहे. परंतु, सहायक धर्मदाय आयुक्तांकडून आजपर्यंत पुढील कार्यवाहिसाठी काही आदेश आलेले नाहीत.
-पांडुरंग माचेवाड, तहसीलदार तथा देवस्थानचे अध्यक्ष


पाच वर्षांचा कार्यकाळ संपला

आमचा विश्वस्त मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ शुक्रवारी (ता.आठ) संपुष्टात आला. आमच्या कार्यकाळात बरीच विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामध्ये भक्तांची देवी सभागृहाच्या कामाचा आवर्जून उल्लेख करता येईल.
-गणेश देशमुख, विश्वस्त तथा नगरसेवक


सेवा करण्याची संधी मिळाली

पाच वर्ष सल्लागार सदस्य म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. यासंधीचे सोने करीत विकासकामे केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारता आला याचे समाधान आहे.
-डॉ. विलास खरात, देवस्थानचे सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.