विकास देशमुख
छत्रपती संभाजीनगर : ‘बरे झाले देवा कुणबी केलो। नाही तरि दंभेंचि असतो मेलो।।’ या अभंगात संत तुकाराम महाराजांनी कुणबी शब्दाचा उल्लेख केल्याचे सर्वश्रुत आहे. पण, वारकरी साहित्याच्याही आधी शेकडो वर्षांपूर्वी ‘लीळाचरित्र’ आणि ‘श्री. गोविंदप्रभूचरित्र लीळा’च्या मूळ संहितेत ‘कुणबी, पाटील, मऱ्हाटा’ या शब्दांचा उल्लेख आहे, अशा नोंदी अलिगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तथा महानुभावपंथी योगेश मुरारीमल शेवलीकर यांनी त्यांच्या शोधनिबंधात केल्या.
‘लीळाचरित्र’ हे चक्रधरस्वामींचे चरित्र आहे. तो मराठीतील पहिला ग्रंथ आहे. त्याचे कर्ते पंडित म्हाइंभट सराळेकर आहेत. याप्रमाणेच महानुभाव साहित्यात श्री. प्रभूंचे चरित्रही आहे. ‘ऋद्धिपूरलीळा’ किंवा ‘श्री. गोविंदप्रभू चरित्र लीळा’ असे त्याचे नाव आहे. या दोन्ही ग्रंथांत ‘कुणबी, पाटील, मऱ्हाटा’ या शब्दांचा उल्लेख आहे. शेवलीकर यांनी सांगितले की, ‘‘लीळाचरित्राच्या मूळ संहितेत कुणबी शब्दाचा उल्लेख १३ वेळा, पाटील शब्दाचा उल्लेख दोन तर शेतकरी शब्दाचा उल्लेख नऊवेळा आढळतो. श्रीगोविंदप्रभू चरित्राच्या मूळ संहितेत कुणबी उल्लेख आठ तर शेतकरी उल्लेख दोनवेळा आहे. लीळेत कुणबी, शेतकरी, शेतमालक व पाटील उल्लेख आले आहेत. अर्थात कुणबी हेच पाटील आहेत. मऱ्हाटा शब्दाचा उल्लेख ‘गोलटी गाए’ या लीळेत आहे.
काही संदर्भ असे
१) ‘पयोव्रतानयेनी भट शिष्यापणें’ या लीळेत सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात, ‘नागदेया, गावामध्ये जा. कोरडी भीक्षा घेऊन या.’ आचार्य श्रीनागदेवभट्ट गावामध्ये जातात. ‘पारीं कुणबी बैसले होतें : तयातें म्हणीतलें : ‘आहो पाटील हो ः तुमचा गावीं ब्राह्मणाचीं घरें नाहीं; महात्मे गावां आले असति : तरि काही कोरान्न भिक्षा होआवी?
२) ‘पद्मनाभि उपहारू स्वीकारू’ या लीळेमध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी एक दिवस सकाळी फिरायला गेले. एका शेतामध्ये हरभरा दिसला. सोबत बीड येथील अधिकाऱ्याचा पद्मनाभी नावाचा मुलगा होता. स्वामी म्हणाले, ‘जा चना मागून आणा, आमच्या ठिकाणी उपहार करा.’ तो चना मागण्यासाठी गेला. ‘ते शेतकरी या पाशी गेले’ त्या शेतकऱ्याला म्हणाले, ‘अहो पाटील आम्हा काही चना द्या’ आम्हाला हरभरा द्या. श्रीमंत घरच्या पद्मनाभीला बघून तो शेतकरी म्हणाला, ‘तुम्हाला पाहिजे तेवढा घेऊन जा’ त्याने चना घेतला. ‘तब तो कुणबी (शेतमालक) आला त्याने तो चना रगडून, उपनून दिला.’
लीळेत नाही भेसळ
लीळाचरित्रामध्ये ८०० वर्षांपूर्वीच्या तपशीलवार नोंदी मिळतात. महानुभाव तत्त्वज्ञान हे सकळलिपी, सुंदरलिपी, वज्रलिपी, अंकलिपी आदी अनेक सांकेतिक लिप्यांमुळे सुरक्षित झाले. त्यामुळे आज ते जशाला तसे उपलब्ध आहे. त्यात भेसळ झाली नाही.
कुणबी शब्दाची उत्पत्ती, कुणबी शब्दाचा संदर्भ, कुणबी शब्दाची व्याख्या, कुणबी शब्दातून व्यक्त होणारे जातीय दर्शन, कुणबी हा महाराष्ट्राच्या जडण-घडणीतला कसा महत्त्वपूर्ण घटक राहिला, या अनुषंगाने यादवकालीन संदर्भ शोधण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी महानुभाव साहित्यापेक्षा प्राचीन साहित्य नव्हते. या साहित्यातील कुणब्यांचे जीवनमान, सामाजिक योगदान या बरोबरच व्यवहारिक वर्तन याचा अभ्यास केला. त्यात ८०० वर्षांपूर्वीच्या नोंदी आढळल्या.
- योगेश शेवलीकर ,आचार्य श्रीहंसराज महानुभाव आश्रम, बदनापूर (जि. जालना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.