Abortion : ‘कोडवर्ड’मधून करत होते महापाप; कंपाउंडर, मेडिकल बॉयची रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका

गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात गुन्हा आहे. यासाठी जिल्हानिहाय समितीही नेमलेली आहे. मात्र, तरीही ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हे महापाप सुरूच आहे.
Abortion
AbortionSakal
Updated on

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर - गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात गुन्हा आहे. यासाठी जिल्हानिहाय समितीही नेमलेली आहे. मात्र, तरीही ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हे महापाप सुरूच आहे. या साखळीचा विचार केला तर कंपाउंडर, मेडिकलवर काम करणारी मुले हे पहिली कडी आहेत. शेवटची कडी गर्भपात करणारे आणि भ्रूणाची विल्हेवाट लावणारे डॉक्टर आहेत. यामध्ये सर्वच दवाखाने किंवा डॉक्टर, त्या व्यवसायाशी संबंधित मंडळी दोषी नसून, रॅकेटमध्ये समावेश असलेल्या मंडळींचा समावेश आहे.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना अजूनही स्त्री-पुरुष हा भेद मिटलेला नाही. ग्रामीण नव्हे, तर शहरी भागातही अद्यापही मुलींकडे दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. वंशाला दिवा असावा या भूमिकेतून समाज अद्यापही बाहेर आलेला नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच गर्भलिंगनिदान करणारे आणि अवैधरीत्या गर्भपात करणारे रॅकेट महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटचा तपास अद्याप सुरू असून, १० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली. साक्षी थोरात नावाची तरुणी इतरांच्या मदतीने हे रॅकेट चालवत होती. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

कसे चालते रॅकेट?

गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सुरवातीला एजंटची भूमिका साकारणारे दलाल महत्त्वाची कडी आहेत. यामध्ये प्रामुख्याने दवाखान्यात काम करणारे कपांउंडर, मेडिकलवर काम करणारी मुले, दवाखान्यात साफसफाईसाठी असलेला नोकर वर्ग यांचा समावेश आहे. ज्या व्यक्तीला पहिली मुलगी आहे आणि त्याला वंशाला दिवा हवा असेल असे दांपत्य ही एजंट मंडळी शोधते.

ग्रामीण भागात सहसा त्यांना अशी ग्राहके मोठ्या प्रमाणावर भेटतात. ग्रामीण भागात चर्चेतून अशा दलालांकडून मेसेज पाठवणे सोपे जाते. गर्भलिंग निदानासाठी इच्छुक व्यक्ती या एजंटशी संपर्क साधतात. हा सगळा व्यवहार आणि बोलणे गोपनीय राहील याची काळजी घेतली जाते. एजंट त्यांच्याकडून समोरील व्यक्ती पाहून रक्कम आकारतात. यानंतर त्यांना गर्भलिंग निदान करणाऱ्या मंडळीकडे पाठवण्यात येते.

या ठिकाणी निदान झाल्यानंतर मुलीचा गर्भ असल्यास तो ठेवायचा की नाही, यावर विचार केला जातो. गर्भ ठेवायची इच्छा नसल्यास त्यांना पुढील साखळीकडे गर्भपातासाठी पाठवण्यात येते. या ठिकाणी डॉक्टराकडून गर्भपात केला जातो. या ठिकाणी वेगळी रक्कम आकारण्यात येते. गर्भपात झालेल्या भ्रूणाची विल्हेवाट लावण्याचे काम या डॉक्टर मंडळीचीच माणसे करतात. पोलिसांच्या तपासात विविध गुन्ह्यांत हीच कार्यपद्धती समोर आली आहे.

सात वर्षांत सात कारवाया

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या सात वर्षांत अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी सात कारवाया करून गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवाया पुढीलप्रमाणे आहेत.

  • मे २०१७ जिन्सीत एमबीबीएस असल्याचे भासवत गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ. चंद्रकला गायकवाड आणि तिची मदतनीस शांता सातदिवेचे रॅकेट उघड.

  • जानेवारी २०१९ उस्मानपुऱ्यात डॉ. सूरज सूर्यकांत राणा याच्या अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर कारवाई

  • फेब्रुवारी २०१९ एपीआय कॉर्नर येथील विमल मदर केअरवर छापा.

  • फेब्रुवारी २०२३ चितेगाव येथे बीएचएमएस डॉ. अमोल जाधव, सोनाली जाधव यांचे गर्भपात केंद्र उघडकीस.

  • मार्च २०२३ जटवाड्यात डॉ. शामलाल जैस्वाल, नर्स सविता थोरात यांचे अवैध गर्भपात केंद्र उघडकीस

  • जानेवारी २०२४ वाळूजमध्ये डॉ. सतीश सोनवणे आणि आशा वर्कर वैशाली जाधव यांचे रॅकेट उघड

  • १२ मे २०२४ गारखेडा भागात अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आईच्या मदतीने गर्भलिंगनिदानाचे रॅकेट चालवत असल्याचे उघड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.