Bank Scams: आणखी एक 'आदर्श' घोटाळा; ६० कोटींचे बनावट कर्ज अन् गावकऱ्यांना बँकांच्या नोटिसा, नागरिकांची दिवाळी तणावात

Bank Scams
Bank Scams
Updated on

विकास देशमुख/प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. आता आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे समोर आले. बनावट कागदपत्रांआधारे बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी परस्पर अनेक जणांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. एकट्या शेंद्रा कमंगर गावातील ३२ जणांच्या नावे तब्बल ६० कोटी ४४ लाख ९९ हजार रुपये कर्ज काढण्यात आले. विशेष म्हणजे, बँकेकडून नोटीस आल्यानंतर आपल्या नावे कर्ज असल्याचे संबंधितांना माहिती पडले! त्यामुळे ते सर्व जण तणावात आहेत.

आदर्श घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला शेंद्रा कमंगर येथील नामदेव दादाराव कचकुरे हा आदर्श बँकेत २३ वर्ष सहव्यवस्थापक होता. त्याने अधिक व्याजाच्या आमिषाने गावातील अनेकांना बँकेत ठेवी ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, गावातील ३२ जणांच्या नावे त्यांच्या परस्पर कर्ज उचलले. ही बाब आता उघड झाली. ऐन दिवाळीपूर्वी या सर्वांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्यानंतर त्यांना आपल्या नावे कर्ज असल्याचे माहिती पडले. त्यामुळे हे सर्वजण तणावाखाली आहेत.


शेती गेली, पैसे गेले; न घेतलेले कर्ज आले -

शंकर नाईकवाडे यांनी एक एकर शेती विकली होती. त्यापैकी ५९ लाख रुपयांची ‘आदर्श’मध्ये एफडी केली. ही रक्कम मिळावी, यासाठी ते प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ९४ लाख ३२ हजार ४०७ रुपयांचे कर्ज असल्याची नोटीस आली. हे कर्ज त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीने घेतलेलेच नाही. ‘एफडी’वेळी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून कुणीतरी ते परस्पर उचलल्याचा दावा नाईकवाडे यांनी केला.

व्यवसाय चहाविक्रीचा; कर्ज कोटींचे -

अनिल एकनाथ कचकुरे हे शेंद्रा फाट्यावर चहा विक्री करतात. त्यांचे आई-वडील, पत्नी या सगळ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले गेले. एवढे मोठे कर्ज घेतले तर चहा टपरीऐवजी फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले नसते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सैनिकालाही त्रास -

विष्णू बहादुरे हे सैन्य दलात जवान आहेत. दिवाळीसाठी ते गावी आले. दरम्यान, ऐन दिवाळीपूर्वी आईच्या नावे २ कोटी ४ लाख १४ हजार ५९९ रुपये कर्ज असल्याची नोटीस त्यांना आली. या कर्जाविषयी त्यांच्या आईला काहीही माहिती नाही. सुटी कुटुंबासोबत घालवण्याऐवजी बहादुरे आता बँक, डीडीआर ऑफीस, पोलिस यांच्याकडे चकरा मारत आहेत.

कुणी मृत तर कुणाचे खातेच नाही -

शेंद्रा येथील ज्यांच्या नावे कर्ज आहे, त्यापैकी चौघे मृत आहेत. सहा जणांचा या बँकेशी काहीच संबंध नाही. त्यांचे या बँकेत खातेही नाही किंवा ते कधी आदर्श बँकेत कामानिमित्तही गेले नाहीत, त्यांचे आधार आणि पॅनकार्डचा वापर करून त्यांच्या नावे कर्ज घेतल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ज्यांनी या बँकेत गुंतवणूक केली अशांपैकी काहींच्या नावे परस्पर कर्ज उचलले गेले. ज्यांनी १ ते ५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते नियमाने फेडले त्यांच्या नावावर तब्बल १ ते २ कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलण्यात आले.

Bank Scams
Manoj Muntashir: 'लंका जला देंगे' चा तुम्हाला त्रास मग 'घंटा लेकर जाएगा…' कसं चालतं? मनोज मुंतशिरचं दु:खचं वेगळं!

मोबाइल क्रमांकही संचालकांचा -

ज्यांच्या नावे कर्ज उचलले गेले त्यांच्या नावापुढे जो मोबाइल क्रमांक दिला गेला तो एक तर बँकेचे संचालक किंवा अधिकाऱ्याचा आहे किंवा बंद असलेला क्रमांक आहे. ३२ जणांपैकी एकाचाही क्रमांक खरा नाही.

अंगठेही दुसऱ्याचेच -

काही निरक्षर महिलांच्या नावे कर्ज घेण्यात आले. त्यांच्या अंगठ्यांचे ठसे दुसऱ्याचेच आहेत. ज्यांना सही करता येत नाही त्यांची सही दाखवलेली आहे. विशेष म्हणजे हे कर्जदारच एकमेकांचे जामीनदार दाखवलेले आहेत. सह्या बनावट आहेत.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय म्हणते -

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता अधिकारी म्हणाले, ‘शेंद्रा प्रकरणाच्या तक्रारीचा तपास पोलिसांकडे आहेत. प्रकरण प्रशासकांकडे वर्ग करून पुढील कारवाई केली जाईल.’

यांच्या नावे उचलले कर्ज

  1. संजय शेषराव कुटे- १ कोटी २४ लाख ५ हजार २४०

  2. संजय शेषराव कुटे- ७५ लाख ७८ हजार ८३७ रुपये

  3. भीमराव बंडू तांबे- ४३ लाख ९८ हजार २३४ रुपये

  4. राजू भावलाल कचकुरे- १ कोटी ६४ लाख ७१० रुपये

  5. रामेश्‍वर बाबूराव कचकुरे- १ कोटी १२ लाख ९३ लाख ६७९ रुपये

  6. ताराबाई संजय कुटे- २ कोटी ५ लाख ७३ हजार २९७ रुपये

  7. राजू दादाराव कुचकुरे- २ कोटी ७९ लाख ९८ हजार ४ रुपये

  8. कमलाबाई सुभाष कुटे- २ कोटी२९ लाख ३५ हजार ६५४ रुपये

  9. जनाबाई भुजंग तांबे- २ कोटी ३० लाख २८ हजार ९२१ रुपये

  10. मोसीन यासीन कुरेशी- २ कोटी २१ लाख ५५ हजार ७८२ रुपये

  11. राजू बाबूराव कचकुरे- २ कोटी ३४ लाख ६२ हजार ४५२ रुपये

  12. भागुबाई नारायण कुटे- २ कोटी ३४ लाख ९७ हजार ८५ रुपये

  13. पुंजाबाई राजू तांबे- १ कोटी ७० लाख ५५ हजार ३७० रुपये

  14. रामेश्‍वर त्रिंबक घोडके- १ कोटी ७५ लाख २४ हजार ३८५ रुपये

  15. गणेश भीमराव कचकुरे- १ कोटी ४४ लाख १८ हजार ५१६ रुपये

  16. संगीता अनिल कचकुरे- २ कोटी १३ लाख २५ हजार १३५ रुपये

  17. धोंडीराम शेषराव कुटे- १ कोटी ९१ लाख ६३ हजार ८५२ रुपये

  18. त्रिंबक जिजा घोडके- २ कोटी १० लाख ३८ हजार १६७ रुपये

  19. जनाबाई आगाजी कचकुरे- २ कोटी १२ लाख ११ हजार ६४ रुपये

  20. पांडू दत्तू कचकुरे- २ कोटी ८ लाख ६५ हजार ३५६ रुपये

  21. लताबाई प्रकाश बहादुरे- २ कोटी ४ लाख १४ हजार ५९९ रुपये

  22. गंगुबाई नारायण कचकुरे- २ कोटी ३ लाख ९३ हजार ८६ रुपये

  23. उमा शंकर नाईकवाडे- १ कोटी ९४ लाख ३२ हजार ४०७ रुपये

  24. वंदना वैजीनाथ मुळे- १ कोटी ८० लाख ६६ हजार ७८८ रुपये

  25. मीनाबाई भाऊसाहेब नाईकवाडे- २ कोटी २६ लाख ४२ हजार २२१ रुपये

  26. द्वारकाबाई पिराजी कचकुरे- १ कोटी ९० लाख ४७ हजार ४३४ रुपये

  27. चंद्रकला सर्जेराव कचकुरे- २ कोटी ७८ हजार २३५ रुपये

  28. रूपाली गजानन तांबे- २ कोटी २४ लाख ७७ हजार ११७ रुपये

  29. कविता शिवाजी कचकुरे- २ कोटी ३६ लाख ९७ हजार ३१४ रुपये

  30. सरिता तुकाराम कचकुरे- १ कोटी ४३ लाख ५३ हजार ४७४ रुपये

  31. रुख्मन एकनाथ कचकुरे- २ कोटी १ लाख ६ हजार ७३० रुपये

  32. समृद्धी किराणा जनरल स्टोअर्स- १ कोटी ५६ लाख २६ हजार ८७१ रुपये

    एकूण- ६० कोटी ४४ लाख ९९ हजार रुपये 

Bank Scams
Uday Samant : आम्ही देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मानतो; असं का म्हणाले शिंदे गटाचे मंत्री?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.