शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

Analysis on resignation of Harshvardhan Jadhav
Analysis on resignation of Harshvardhan Jadhav
Updated on

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी राजकीय वारसदारही जाहीर केला. मात्र, त्यांच्याकडे सध्या ज्या पदाची जबाबदारी आहे, त्या मनसे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा कुठे दिला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनसेने २००९ साली पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. पक्षाच्या पहिल्या १३ आमदारांमध्ये हर्षवर्धन जाधव यांचाही समावेश होता. मराठवाड्यातून ते एकमेव होते. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसल्याने त्यांना मारहाण झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांच्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभादेखील घेतली. तरीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेतून आमदार झाले. त्यानंतर शिवसेना नेते तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर वारंवार टीका करत होते.

जाधव यांनी त्यानंतरही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१९ ची लोकसभा निवडणूक औरंगाबादेतून अपक्ष म्हणून लढवली. पराभव झाला तरीही तिसऱ्या क्रमांकावर राहून पावणेतीन लाख मते मिळवल्याने जाधवांच्या ट्रॅक्टरच्या फॅक्टरची चर्चा राज्यभर झाली. त्यांच्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. एकूणच काय तर शिवसेनेचा गढ असलेल्या औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाधवांनी शिवसेनेच्या नाकीनऊ आणले होते. लगोलग विधानसभा निवडणूकीतही कन्नड मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरचे काही महिने ते राजकारणापासून अलिप्तच होते.

जानेवारीच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन जाधव मनसेत येणार अशी चर्चा सुरू झाली. २२ जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेटही घेतली. मनसेच्या राज्य अधिवेशनापूर्वी त्यांनी मनसेत प्रवेश केला. पाच दिवसातचच राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले, त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर २९ फेब्रुवारीला हर्षवर्धन जाधव यांच्या गळ्यात मनसे
जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली.
 
पत्नी भाजपात जाणार का?
राजकीय वारसदार घोषित करत असताना सौभाग्यवती संजना जाधव या महाराष्ट्राचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळेच यांच्या पत्‍नी भाजपमध्ये जातील कि काय? अशीही चर्चा सुरू झाली आहे. राजकारणाची निवृत्ती जाहीर करीत असताना त्यांनी मनसे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
देत आहे किंवा त्याबाबतचा कोणताही उल्लेख त्यांनी व्हिडिओत केलेला नाही. यामुळे जाधव आपला निर्णय फिरवणार तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
 
मनसेत सहभाग मोजकाच!
राज ठाकरे यांचे 23 फेब्रुवारीला केलेली जंगी स्वागत असो किंवा त्यानंतर तिथीनुसार शिवजयंतीला राज ठाकरे शहरात आल्यानंतर जुजबी सहभाग आणि व्यासपीठावरल काही काळ वावर. तसेच एमआयएमच्या वारिस पठान यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेतील हजेरी वगळता हर्षवर्धन जाधव हे मनसेतील ७५ दिवसांच्या कालावधीत तसेही सक्रिय नव्हतेच. पण,
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचा शहरात असलेला तरुणांचा गट लक्षात घेता, मनसेसाठी उपयुक्त चेहरा होता. मात्र, जाधव यांनीच राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे त्यांच्यावर विसंबून असलेल्यांची गोची झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.