महिलेच्या सासू, दिरासह कुटुंबीयांना मारहाण करीत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमेला सोमवारी (ता.१६) सकाळी १० वाजताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद - महिलेच्या सासू, दिरासह कुटुंबीयांना मारहाण करीत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमेला सोमवारी (ता.१६) सकाळी १० वाजताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, महिलेने फिर्याद देताच पोलिसांनी रविवारी तत्काळ गुन्हा दाखल करुन तब्बल १४ तास तपास केला आणि नंतर अटक केली. त्यानंतर ढुमे याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते.
नारळीबाग येथील ३० वर्षीय पीडिता पती, मुलीसह सिडकोतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होती. त्याच रेस्टॉरंटमध्ये आरोपी विशाल ढुमे आणि त्याचे दोन मित्र जेवायला आलेले होते.
ढुमे आणि पीडितेच्या पतीची आधीपासून ओळख असल्याने ते तेथे भेटले. त्यानंतर ढुमेने पोलिस आयुक्तालयातील निवासस्थानी येण्यासाठी त्यांना लिफ्ट मागितली. कारने येताना ढुमेने कारमध्येच पीडितेची छेड काढली. स्वत:च्या घरी न जाता पीडितेच्या घरी जाऊन त्यांच्या बेडरुममधील वॉशरूम वापरण्याचा हट्ट करीत तिच्या पतीसह, दीराला मारहाण केली. सासू व नातेवाईकांना शिवीगाळ केली.
अन् ढुमेवर संक्रांत
रात्री पावणे दोनच्या सुमारास बराचवेळ हा धिंगाणा सुरु होता. अखेर डायल ११२ च्या पोलिसांना बोलावण्यात आले होते. तशी तक्रार पीडितेने सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी गुन्हा दाखल झाला. अधिक तपास उपायुक्त शीलवंत नांदेडकर करीत आहेत. सोमवारी आरोपी ढुमे सिटी चौक ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यांना अटक करून जबाब नोंदविला. दरम्यान, त्याला त्यानंतर ढुमेंनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला, अर्जावरील सुनावणीवेळी आरोपी हे वरिष्ठ अधिकारी असून ते तपासात अडथळा निर्माण करु शकतात.
घटनास्थळावरुन सीसीटीव्ही चित्रण जप्त करण्यात आले असून आरोपीने महिलेचा विनयभंग करुन त्यांच्या पतीसह इतर नातेवाईकांना देखील मारहाण केल्याने आरोपीला जामीन देण्यात येवू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी केली. तर ढुमेच्यावतीने अॅड. गोपाल पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आर्णेश कुमार प्रकरणाच्या खटल्याचा हवाला देत आरोपी विशाल ढुमे पोलीस अधिकारी असल्याने पसार होण्याची शक्यता नाही.
गुन्ह्याखाली त्यांना जास्तीजास्त सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा आहे. तसेच कोर्टाला जामीन देण्याचा आधिकार असल्याचा युक्तीवाद केला. सुनावणीअंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी २५ हजारांच्या जात मुचलक्यावर ढुमेचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, शनिवारी (ता.१४) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर सकाळीच साडेनऊपासून सुरु झालेला पोलिसांचा तपास तब्बल १४ तास चालला. यामध्ये पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला. तसेच घटनास्थळी जाऊनही पिडीतेची सासू, पती, दीर यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन वेटर आदिंचे जबाब नोंदविले.
...अन् अधिकारी बोलू लागले
ढुमेविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर शहर पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे आपल्या भावना बोलून दाखविल्या. ढुमेपासून कसा त्रास होता? याबाबत अनेकांचा तक्रारींचा सूर होता. अनेकवेळा रात्री नशा केल्यानंतर तो पोलिस ठाण्यात जाऊन बसत असे. काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला समजावून सांगितले होते. पद मिळवायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याचा सदुपयोग केला पाहिजे, अशी त्यांच्यात चर्चाही झाली होती. मात्र, काही दिवसांतच ढुमेवर ही संक्रांत आली.
चक्क एसपींच्या केबिनमध्ये गेला होता दारु पिऊन!
औरंगाबादेत बदलीहून येण्याआधीही नगरमध्ये कार्यरत असताना सहायक आयुक्त विशाल ढुमे हा दारु पिऊन चक्क पोलिस अधिक्षकांच्या केबीनमध्ये घुसला होता. या ना त्या प्रकरणात कायम चर्चेत असलेला ढुमे याची बदली डिफॉल्टर म्हणून करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे महिलेचा विनयभंग केल्याच्या घटनेनंतर नगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांना ‘हा असाच आहे, एक दिवस हे होणारच होते’ या शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे समजते!
ढुमेविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधातील कारवाईसंबंधित सविस्तर अहवाल पोलिस महासंचालक यांना पाठविण्यात आला आहे.
- डॉ. निखील गुप्ता, पोलिस आयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.