वैजापूर (जि.औरंगाबाद) : शहरातील लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलमध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्या प्रकरणी दवाखान्याचे मालक व चालक डाॅ. गणेश अग्रवाल यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.अग्रवाल यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून आपलेच घोडे दामटल्याचा प्रकार त्यांच्या चांगलाच अंगलट आला. या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डाॅक्टरांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान महसूल विभागासह आरोग्य विभागाने ही कारवाई केली.
शहरातील अन्य बहुतांश दवाखान्यांमध्ये असाच अंदाधुंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे अशा बड्या धेंडांनाही कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार राहूल गायकवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखिल धुळधर, आर.व्ही.गायकवाड व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे यांना शहरातील लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार या पथकाने तीन एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास डाॅ. गणेश अग्रवाल यांच्या देवगिरी हाॅस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता गंभीर प्रकार उघडकीस आला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये तब्बल सहा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे या पथकास निदर्शनास आले. याशिवाय अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. कोरोना रुग्णांसाठी विलगीकरणाची कोणतीही व्यवस्था हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली नव्हती. रुग्णांच्या कक्षेत त्यांच्या नातलगांचा खुलेआमपणे वावर दिसून आला. एमडी पदवी नसतानाही अतिदक्षता कक्ष चालवून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते.
कोरोना रुग्णांवर उपचार करणारा स्वतंत्र कर्मचारी वर्ग, डाॅक्टर व पीपीएफ किट आढळून आली नाही. त्यामुळे या पथकातील अधिकाऱ्यांनी डाॅ. गणेश अग्रवाल यांना याबाबत जागेवरच विचारणा केली असता, त्यांनी सदरील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी फिजिशियन हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांवर मीच उपचार करीत असल्याची कबुली त्यांनी पथकाला दिली. हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची यादी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली नाही. अधिकाऱ्यांनी विचारलेली अन्य माहिती अग्रवाल यांनी दिली. या माहितीच्या आधारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी ता.५ एप्रिल रोजी डाॅ. अग्रवाल यांना नोटीस बजावण्यात येऊन खुलासा मागितला होता. परंतु त्यांनी नोटिसीला दिलेले उत्तर असमाधानकारक होते.
शासनाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना कोरोना रुग्णांवर मीच अधिकृतपणे उपचार करतो. असे सांगून नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक केली. देवगिरी हाॅस्पिटलमध्ये रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था न करता एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांची भरती केली व नागरिकांच्या जीवितांसाठी धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती केली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवगिरी हाॅस्पिटलचे मालक डाॅ. गणेश अग्रवाल (रा.वैजापूर) यांच्याविरुद्ध फसवणूकीसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन - गणेश पिटेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.