औरंगाबाद : ‘जय भीम’च्या झेंड्यांचा बाजारात बोलबाला

अठरा प्रकारच्या दोन लाखांच्यावर झेंड्यांची ठिकठिकाणी विक्री
jai bhim flags
jai bhim flagssakal
Updated on

औरंगाबाद : एका रिबनपासून सुरू केलेला व्यवसाय आता सहा इंच ते पाच मीटर कपड्यात विविध १८ प्रकारच्या झेंड्यांपर्यंत पोचला आहे. या व्यवसायात एका झेंड्यामागे २५ पैशापासून ९ रुपये मोबदला मिळतो. परंतु, या मोबदल्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भीम’ नावाचा झेंडा घरोघरी पोचल्याचे पाहून काम केल्याचे समाधान केशव सोनवणे यांना मिळते. त्यांनी तयार केलेले ‘जय भीम’ नावाचे झेंडे व तोरणाला राज्यभरात मागणी असते. यावर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दोन लाखांच्यावर झेंड्यांची विक्री झाली आहे.

सिडको एन-६ येथील रहिवासी केशव यादव सोनवणे हे २००२ पासून निळा, पंचशील ध्वज तयार करून त्याची ठोक भावात विक्री करतात. यात तोरण, त्रिकोणी झेंडे, सहा इंचीपासून ते पाच मीटरपर्यंतचे झेंडे तयार करतात. निळ्या सॅटीन कापडावर ‘अशोक चक्र’ आणि त्याखाली ‘जय भीम’ नाव प्रिंट केलेल्या झेंड्यांना अधिक मागणी असते. सोनवणे यांच्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवसायाने अनेक कुटुंबांना रोजगाराचा आधार दिला आहे.

अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळवून त्यांच्या कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू आहे. सोनवणे हे केवळ निळे झेंडे तयार करत नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भगवे झेंडेही तयार करतात. तसेच त्यांनी तयार केलेल्या गणपतींच्या आसनालाही मोठी मागणी असते. दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ.आंबेडकरांची जयंती साजरी झालेली नाही.

मात्र यंदा डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. आतापर्यंत दोन लाखांच्यावर निळ्या झेंड्याची विक्री झाली आहे. सोनवणे हे आपल्या घरामध्ये जवळपास १८ प्रकारचे झेंडे तयार करतात. त्यांच्यासोबत मुलगा, सुना व नातीसह शेजारी राहणाऱ्या जवळपास दहा ते तेरा महिला झेंडे तयार करण्याचे काम करीत आहेत.

राज्यभरात मागणी

सोनवणे यांनी तयार केलेले झेंड्यांची मागणी ही दीक्षाभूमी नागपूर, महाड, चिखली, बुलडाणा, अमरावती, कोल्हापूर, जळगाव, भुसावळ, सांगली, सातारा, मालेगाव, बीड, उस्मानाबाद, परभणी यासह राज्याच्या विविध भागापर्यंत आहे. या मागणीमुळे वर्षभर झेंडे तयार करणाचे काम हाताला मिळते आणि त्यातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.