करमाड (जि.औरंगाबाद) : एखादा महामार्ग म्हटला की वाहतुकीस दुरूस्तीचे काम करतानाचा अडथळा, फार-फार म्हटल तर दुभाजकावर असलेल्या झाडांना पाणी टाकणार्या टॅंकरची अडचण एवढंच काय ते आपल्याला माहीत. दरम्यान, मागील काही दिवसांपासुन चिकलठाणा ते शेंद्रा एमआयडीसी (Shendra MIDC) दरम्यान जालना महामार्गावर व लगत एकुण सहा कामे सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी की या कामांसाठी असाच काहीसा अनुभव वाहनधारकांना येत आहे. या अवघ्या 8 किलोमीटर अंतरासाठी एव्हाना हे दहा मिनिटांचे अंतर कापायला सध्या दुप्पट वेळ लागत असुन अपघाताची शक्यता तिप्पटीने वाढल्याचे चित्र आहे. यावर विश्वास बसत नाही ना, तर बघा चिकलठाणा येथील आठवडे बाजारापासुन क्रॅम्ब्रीज चौकाकडे जातांना महामार्गाच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठीच्या नालीचे काम चालू आहे. त्या लगत शहरात (Aurangabad) जसे रूंदीकरण करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले तसे सध्या रूंदीकरण करण्यात येऊन काही ठिकाणी नाली (Aurangabad-Jalna Highway) उभारणीचे तर काही ठिकाणी खडीकरणाचे काम सुरू आहे.
महामार्गावर चिकलठाणा ते शेंद्रा एमआयडीसी या भागात खड्डे पडलेल्या व खराब झालेल्या ठिकाणी पॅचवर्कच्या नावाखाली ठिगळे देण्याचे काम महिन्यांभरापासुन सुरू आहे. सोबतच रस्ता दुभाजकावर लाईट्स बसविण्यासाठीचे पोल (खंबे) उभे करण्यात येत आहे तर सोबतच त्यासाठी लागणार्या इलेक्ट्रिक वायरसाठी दुभाजकावरच नालीचेही खोदकाम सुरू आहे. कॅम्ब्रीज चौकापासुन शेंद्र्याकडे गॅस पाईपलाईनसाठी नाली करण्याचे, त्याचे पाईप्स टाकण्यासाठीचे काम मागील चार महिन्यांपासुन सुरू आहे. त्यासाठीचे आवश्यक पाईप महामार्गालगतच ठेवण्यात येऊन तेथेच त्याची गॅस वेल्डिंगही करण्याचे काम सुरू आहे. त्यावर कहर म्हणून की काय रस्ता विकासक एजंसीचे दुभाजकावरील झाडांना पाणी घालण्यासाठीचे टॅंकर दुभाजकालगत तासन् तास पाणी टाकण्याचे काम करत असते. त्यामुळे हा महामार्ग सध्या 'मौत का कुआँ' बनल्याचे चित्र आहे. पॅचवर्कच्या नावाखाली दोन-दोन दिवस एकेरी वाहतुक व्यवस्था करण्यात येत असल्याने अपघाताच्या शक्यतेत तिप्पटीने वाढ झाली आहे. या ठिकाणाहुन जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो. शेंद्रा एमआयडीसीतील कंपन्यांच्या तीन शीप्ट सुटण्याच्या वेळी तर तासन् तास वाहतुक खोळंबा होत असुन अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ लागत आहे. गॅस पाईपलाईनसाठी उकरलेली माती काम झाल्यानंतर महामार्गावर पसरत असल्याने रस्ता घसरगुंडी ठरत आहे. ठिगभर मातीचा गंज जमा झालेल्या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गालगतच गॅस वाहून नेण्यासाठीचे पाईप्स अस्ताव्यस्त टाकण्यात आल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे. नाली दाबण्यासाठी जेसीबी अचानक रस्त्यावर येतो. नालीत पाईप टाकण्यासाठीचे क्रेन अचानक रस्त्यावर येते. दुभाजकावर पोल उभारणी करताना पोल क्रेनने उचलताना महामार्गावरील संपूर्ण वाहतुक थांबवण्यात येते. मात्र, एखाद्या जोरात येणार्या दूर अंतरावरील वाहनधारकास अचानक पोल आडवा आल्याचे पाहुन चांगलाच घाम फुटत असल्याचेही उदाहरणे आहेत. यातच उभ्या केलेल्या कॅम्ब्रीजच्या अलीकडील एका पोलला एक वाहन धडकून तो पोल चांगलाच वाकला गेला होता. सुदैवाने तो पूर्णपणे कोसळून महामार्गावर आडवा न झाल्याने मोठे संकट टळले. त्यामुळे सद्यःस्थितीत जालना महामार्ग चांगलाच गाजतो आहे. सोबतच या विविध कामांसाठी वापरली जाणारी वाहने महामार्गलगतच उभी करण्यात येतात. संबंधित वरिष्ठांनी त्वरीत ही कामे करणार्या कंत्राटदारांना योग्य त्या सुचना देऊन ती टप्प्याटप्प्यांत किंवा एका नंतर एक करण्याचे आदेश द्यावेत असी मागणी वाहनधारकांकडुन होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.