औरंगाबाद: कोरोबाधितांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. महापालिकेच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या ५४ हजार ४५९ कोरोना बाधितांपैकी ३३ हजार ६५५ पुरुष आहेत, तर २० हजार ८०४ महिलांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर लहान मुलांची बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुलांमध्ये होणारा संसर्ग रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या संख्येची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरी त्याचा फार परिणाम दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ११ मार्चपासून शहर व जिल्ह्यात अंशत: लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे रात्री आठ वाजेनंतर सर्व दुकाने बंद केली जात आहे. दर शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाउन पाळला जात आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात घराबाहेर फिरणाऱ्यांच्या संख्येवर अद्याप नियंत्रण आलेले नाही. रहदारी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शून्य ते पाच या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ८९९ वर गेली आहे. दररोज दहा किंवा त्यापेक्षा जास्त लहान मुले कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबरच पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. पाच ते १८ वयोगटातील ५३६७ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. १८ ते ५० या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ३४२ एवढी झाली आहे.
कोरोनाबाधितांमध्ये तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. ५० आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील १५ हजार ८५१ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. हे प्रमाण तरुणांच्या संख्येच्या जवळपास निम्मे आहे. या सर्व वयोगटातील मिळून ५४ हजार ४५९ व्यक्ती आतापर्यंत कोरोनाबाधित झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.