औरंगाबाद : महापालिका क्षेत्रात गोवर साथीचा उद्रेक होत आहे. गुरूवारी (ता. १) एका दिवसात सात पॉझिटिव्ह तर १४ संशयित बालके आढळले आहेत. गोवरमुळे पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून गुरुवारपासून ९ महिने ते ५ वर्षवयोगटातील बालकांना अतिरिक्त डोस देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई, भिवंडी, पुणे पाठोपाठ औरंगाबाद महापालिका क्षेत्रात गोवर साथीचा वेगाने फैलाव होत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून महापालिका क्षेत्रात गोवर साथीचा फैलाव झपाट्याने होत आहे. शहरालगतच्या भागात गोवर साथीचे बालके आढळत आहेत. महापालिकेकडून संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले की, गुरुवारी सात बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोवर बाधित बालकांमध्ये विजयनगर तीन, कैसर कॉलनी एक, बायजीपुरा एक आणि भवानीनगरमधील दोन बालकांचा समावेश आहे. तसेच अंबिकानगर, गणेश कॉलनी, नक्षत्रवाडी, नारेगाव, एन-८, चिकलठाणा, हर्सूल, हर्षनगर या भागात प्रत्येकी एक आणि बायजीपुरा आणि पुंडलीकनगर भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे १४ बालके गोवर संशयित म्हणून आढळून आली आहेत.
आतापर्यंत शहरातील १७ बालके गोवर बाधित आढळून आले आहेत. ज्या भागात गोवर साथीचे दोन बालके पॉझिटिव्ह आढळून आले असतील त्या भागात गोवरचा उद्रेक झाला असे जाहीर केले जात आहे. नेहरुनगर, चिकलठाणा आणि विजयनगर भागात दोन पेक्षा अधिक बालके गोवरची पॉझिटिव्ह निघाल्याने या भागात गोवरचा उद्रेक झाला असल्याचे जाहीर करण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
अतिरिक्त डोस देण्याची सूचना
शासनाच्या आरोग्य विभागाकडून गोवर साथीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. ९ महिने ते ५ वर्षवयोगटातील बालकांना गोवर प्रतिबंधक लसीचा अतिरिक्त डोस देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार चिकलठाणा आणि नेहरूनगर भागातील ६४ बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आला. तसेच विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत एमआर-१ मधील १४ आणि एमआर-२ मधील २५ बालकांना गोवरचे लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.