शहरात कोरोना लसीकरण ठप्प
लसमात्रा ठरल्या कालबाह्य ःमहापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
औरंगाबाद, ता. १ : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या लसमात्रा जुने वर्ष सरताच महापालिकेकडील कोरोना प्रतिबंधक लसींचा तब्बल १४ हजार मात्रांचा साठा कालबाह्य ठरला. परिणामी आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोरोना लसमात्रा नसल्याने शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे.(Aurangabad News)
शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केवळ फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस दिली गेली. पुढे ऑगस्ट २०२१ पासून लसीकरणाची व्याप्ती वाढवून ते १८ वर्षांवरील सर्व वयोगटांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. नंतर १२ वर्षांवरील मुलांसाठीदेखील कॉर्बेव्हॅक्स ही लस उपलब्ध झाली. राज्य सरकारकडून वेळोवेळी महापालिकेला मोठ्या माणसांसाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन तर लहान मुलांसाठी कार्बेव्हॅक्स या लसींचा साठा पुरविला गेला.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली.
परिणामी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सिन लसीचे सोळा हजार डोस पडून होते. त्याची एक्स्पायरी डेट १ जानेवारी होती. शेवटच्या टप्प्यात महापालिकेने लसीकरणावर जोर दिला. तरी त्यातील २ हजार लसीच संपल्या. ३१ डिसेंबर रोजी महापालिकेकडे १४ हजार कोव्हॅक्सिन लसी उरल्या होत्या. शनिवारी (ता.३१ डिसेंबर) सायंकाळीच त्या फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवण्यात आल्या. आता या लसी वापरता येणार नाही.
पुरवठा नाही
राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यात महापालिकेला लसींचा नवीन साठा पुरविण्यात आलेला नाही. आता काही देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने खबरदारी म्हणून महापालिकेने राज्य सरकारकडे कोरोना लसींची नव्याने मागणी नोंदविलेली आहे. परंतु त्यानुसार पुरवठा झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.