औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांसह विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार संतप्त झाले असून, महापालिकेच्या निवडणूक विभागात तक्रारींचा पाऊस पडत आहे. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. १३) वॉर्डांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. ते थेट वॉर्ड क्रमांक चार चेतनानगर-राजनगर भागात गेले. त्यांनी वॉर्डाच्या हद्दी तपासल्या असता अनेक नियमबाह्य बाबी समोर आल्या. त्यानंतर संतप्त झालेल्या आयुक्तांनी वॉर्ड रचना व मतदार यादी तयार करणाऱ्या चार जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने दोन शिक्षकांसह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेली आरक्षण सोडत, वॉर्ड रचना व आता प्रारूप मतदार याद्या वादात सापडल्या आहेत. मनमानी पद्धतीने मतदार इतरत्र टाकण्यात आले आहेत. तसेच सुमारे एक लाखाहून अधिक मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. या याद्या पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रारूप मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस सुरू आहे. शुक्रवारी देखील दिवसभर निवडणूक विभागात प्रारूप मतदार याद्यांवर आक्षेप नोंदविण्यासाठी गर्दी झाली होती.
त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी वॉर्डांची पाहणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी सकाळीच ते वॉर्ड क्रमांक चार चेतनानगर, राजनगर भागात दाखल झाले. वॉर्डाच्या सीमांनुसार त्यांनी मतदार यादी तपासण्यात आली. त्यात मोठा घोळ समोर आला. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी संबंधित दोषींना निलंबित करण्याचे आदेश दिले. निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांनी सायंकाळी चार जणांच्या निलंबनाचे आदेश काढले. त्यात सहशिक्षक सुदर्शन शिवाजी घुले, कनिष्ठ लिपिक अजय यारा, शिक्षण सेवक सय्यद जावेद सय्यद चॉंद व आरोग्य विभागाचा कर्मचारी विलास पुंजाराम बडघने यांचा समावेश आहे.
अनेकांनी घेतली धास्ती
आयुक्तांनी शुक्रवारी फक्त एका वॉर्डाची पाहणी केल्यानंतर चार जणांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. शहरातील अनेक वॉर्डात अशाच प्रकारचे घोळ झाले असून, नगरसेवकांच्या सांगण्यावरून घोळ करणाऱ्यांनी आयुक्तांची आता चांगलीच धास्ती घेतली आहे.
सर्वाधिक कमी मतदार
चेतनानगर-राजनगर या वॉर्डात सर्वाधिक कमी मतदार (३५२०) असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार आयुक्तांनी पाहणी करून मदरांसोबत चर्चा केली. त्यात अनेकांनी आपली नावे वॉर्डाच्या प्रारूप मतदार यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे प्रगणक असलेल्या या चारही जणांना निलंबित करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.