औरंगाबाद : रेल्वेवर वीस दिवसांत दुसऱ्यांदा 'दरोडा'
दौलताबाद : रेल्वे सिग्नलवर कपडा टाकून दरोडेखोरांनी औरंगाबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री पोटूळ रेल्वेस्थानकाच्या जवळ घडली. रेल्वे थांबताच तुफान दगडफेक करत दरोडेखोरांनी प्रवाशाची सोन्याची साखळी हिसकावून पलायन केले.
रेल्वे लुटल्याच्या तीन घटना गेल्या वीस दिवसांमध्ये घडल्या आहेत. पहिल्या दोन घटनेनंतर रेल्वेच्या सिग्नललाच ‘खडा पहारा’ देऊन ‘नजर’ ठेवण्याचा दावा प्रशासनाने केला़ होता. मात्र, पोकळ दावा असल्याचे गुरुवारच्या दरोड्याच्या घटनेने स्पष्ट झाले. देवगिरी एक्स्प्रेस पोटूळ रेल्वेस्थानकात शिरण्याच्या पूर्वीच कपडा टाकून सिग्नल झाकण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी दगडफेक सुरू केली.
एस-४ ते एस-९ पर्यंतच्या डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाल्याने प्रवाशांनी तातडीने खिडक्या आणि दरवाजे लावले. तरीही एका ४५ वर्षीय महिलेचे ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून पळविण्यात आली. शिवाय अन्य प्रवाशांकडून मिळेल ते सामान घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. या घटनेत सुमारे २ लाख ५० हजारांचा ऐवज लुटण्यात आला आहे.
या घटनेमुळे जवळपास अर्धा तास रेल्वे थांबली होती. घटनेच्या अनुषंगाने रेल्वेतील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान व रेल्वे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यामुळे जवळच गस्तीवरील शिल्लेगाव पोलिसांचे पथक तातडीने सायरन वाजवत दाखल झाल्याने दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
वीस दिवसांपूर्वी असाच प्रयत्न
यापूर्वी १ एप्रिल रोजी मुंबईहून नांदेडला निघालेल्या नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड-मनमाड डेमू पॅसेंजरमधील प्रवाशांना लुटल्याचे प्रकार घडले होते. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी-कर्मचारी रेल्वे रूळ आणि सिग्नलच्या परिसरात पेट्रोलिंग सुरू केली होती. मात्र, वीस दिवसांत पुन्हा मोठ्या दरोड्याचा प्रयत्न करण्यात आल्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नगर जिल्ह्यातील टोळी?
रेल्वेस्टेशन येथील ग्रीन सिग्नलला कपडा बांधून केवळ लाल सिग्नल दिसेल असे चित्र निर्माण करून रेल्वे लुटण्याचे प्रकार नगर रेल्वे मार्गावर यापूर्वी घडलेले आहेत. हीच टोळी औरंगाबादेत येऊन लुटमार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे लुटमार करणाऱ्या टोळीला रेल्वेच्या सिग्नलबद्दल सखोल माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या टोळीला ‘टिप’देणारा रेल्वेचा कर्मचारी आहे का, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘त्या’भागातील अॅम्ब्युलन्सची घेणार माहिती
देवगिरी एक्स्प्रेसवरील दरोड्याच्या घटनेच्या वेळी दरोडेखोरांनी पलायन करताना, अॅम्ब्युलन्सचा वापर केल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या अॅम्ब्युलन्स मालक-चालकांचा शोध घेऊन तपास करण्याच्या सूचना लोहमार्ग पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.