कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड (Kannad) तालुक्यातील नागद परिसरात मंगळवारी (ता.३१) पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) दोन पाझर तलाव फुटले आहेत. त्यामुळे नागद गावात हाहाकार झाला असून नागद (Aurangabad) गावालगत नदीकाठी राहत असलेल्या कुटुंबाला ग्रामस्थांनी पहाटे तीन वाजता चक्क स्लॅब फोडून बाहेर काढले आहे. नागद (Nagad) गावाजवळ गडदगड धरण आहे. मागच्या आठवड्यातच ते पूर्ण भरले आहे .त्या पाठीमागे गौताळा अभयारण्याकडे (Gautala Sanctuary) भिलदरी तांडा परिसरात दोन पाझर तलाव आहेत. हे दोन पाझर तलाव पहाटे एक वाजल्यानंतर फुटल्याची माहिती मिळत आहे. त्याचे पाणी पूर्ण भरलेल्या गडदगड प्रकल्पात आले. त्यामुळे नागद गावाजवळून जाणाऱ्या नदीला महापूर आला. नदी काठी राहणारे उमेश पाठक यांच्या घरात पाणी शिरले. बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या घरावरील स्लॅब फोडून श्री.पाठक, त्यांच्या पत्नी व दोन मुलींना पहाटे तीन वाजेच्या सुमारास बाहेर काढले.
नागद गावात पाणी घुसून अनेक घरांचे नुकसान झाले. नदी काठी असलेले टपऱ्या वाहून गेल्या. जनावरे वाहून गेले. केळीच्या बागा वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. भिलदरी येथील पाझर तलाव फुटल्यानंतर नदी मार्गात असलेले सायगव्हाण येथील स्मशानभूमीचे शेड वाहून गेले. कन्नड-नागद मार्गावरील सायगव्हाण ते गौताळा दरम्यानच्या पुलाचे कठडे वाहून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर नदीतील माती, दगड गोटे यांचा खच साचला असल्याने वाहतूक अत्यंत धीमी झाली आहे. भिलदरी येथील एक पाझर तलाव पूर्वीच काही प्रमाणात फुटला होता. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वेळा केली होती. मात्र प्रशासनाने पहिल्या पाझर तलावाची दुरुस्ती न केल्याने आज दुसराही तलाव फुटून भयंकर हानी झाली असून प्रशासनाने वेळीच पाऊले उचलली असते तर आजची हानी टाळता आली असती असे भगवान ठाकरे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.