वाळूजमहानगर : बदनामीच्या भितीपोटी म्हणा, की हातून घडलेल्या ‘चुकी’मुळे निष्ठूर झालेल्या एका मातेने पोटच्या गोळ्याला उसाच्या दाट शेतात फेकून दिले. याच्या वेदना तिला झाल्या असतील की, नाही? हे तिचे तिलाच माहीत! पण याच वेदना दुसऱ्या मातेला जाणवल्या. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून दुसरी माता धावतच गेली अन् मातृहृदयाने बाळाला कवटाळताच रडण्याचा आवाजही कुशीत शांत झाला.
ही घटना शुक्रवारी (ता. तीन) दुपारी चारच्या सुमारास एकलहेरा-नांदेड रोडवर घडली. एकलहेरा येथील रुख्मणबाई गांगुर्डे या शुक्रवारी शेतात काम करीत होत्या. दुपारी चारच्या सुमारास शेजारच्या उसाच्या शेतातून त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. परिसरात बाळ कुठून आले हा विचार त्यांच्या मनात आला. बाळाचा टाहो ऐकून त्यांच्या मातृहृदयाला पाझर फुटला.
त्यामुळे त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता उसाच्या शेतात १०० मीटर आत सिमेंटच्या एका गोणीत एक नवजात बाळ त्यांना अत्यवस्थ दिसले. त्यांनी तत्काळ गोणीतून त्याला बाहेर काढले आणि परिसरातील शेतकऱ्यांना माहिती दिली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, गणेश गिरी, महिला पोलिस शिपाई संगीता वैद्य,
विजय पाटील, तुकाराम पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बाळाला बजाजनगर येथील घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी बाळावर उपचार करण्यात आले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे, डॉ. सुशील राऊत यांनी पोलिसांच्या मदतीने बाळाला घाटीत दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती ठीक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.