Chhatrapati Sambhaji Nagar : डबक्यातल्या पाण्याने भिजवलेली ‘केळी घ्या, केळी’!

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर येथे केळी विक्रेत्याने साचलेल्या घाण पाण्यात पोते भिजवून केळांवर ठेवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त झाला. मनसेने तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
banana vendor caught soaking sacks in dirty water
Chhatrapati Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आरोग्य राखण्यासाठी आपण फळे खातो. आजारी व्यक्तीला तर डॉक्टर हमखास फळे खाण्याचा सल्ला देतात. पण एका फेरीवाल्याने केलेला किळसवाणा प्रकार पाहून तर फळं खावीत की नाही, असा प्रश्न पडावा! समाजमाध्यमांवर मंगळवारी टीव्ही सेंटर भागातील एका केळी विक्रेत्याचा गलिच्छ व्हिडिओ व्हायरल झाला.

त्यात रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यात हा विक्रेता पोते भिजवतो आणि तेच पोते केळांवर ठेवून ती ताजी असल्याचे दाखवत आहे. याप्रकरणी मनसेचे चंदू नवपुते यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे.

व्हायरल झालेल्या या क्लिपमधील परिसर टीव्ही सेंटर असल्याचे दिसून येत आहे. या चौकात अनेक फळविक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. सध्या नवरात्रीचे उपवास सुरू असल्याने नागरिकांची या फळविक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. या फेरीवाल्यांपैकी एक विक्रेता हातात पोते घेऊन ते रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये पूर्ण भिजवत आहे.

भिजवलेले पोते घेऊन तो परत हातगाडीवर जातो. हे पोते तो व्यवस्थित गाडीवरील केळांच्या घडांवर पसरवतो! यानंतर तो पुन्हा दुसरे पोते घेऊन पाण्याकडे जातो. हे पोतेदेखील तो भिजवून गाडीकडे येतो. दुसरे पोतेही तो केळीच्या घडावर पसरवतो. यानंतर दुसरे केळीचे घड तो या पोत्यावर ठेवत असल्याचा हा व्हिडिओ आहे.

काविळ, अतिसारासह अन्य आजारांची भीती

घाण पाणी शिंपडलेली केळी खाल्ली तर कावीळ, अतिसार, विषमज्वर यासह इतर जलजन्य आजारांची भीती आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनसेला प्रकार कळताच विक्रेता पसार

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. याची परिसरात चर्चा सुरू झाली. मनसेचे मध्य विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, गणेश साळुंके, अविनाश पोफळे यांनी टिव्ही सेंटर गाठले. मात्र, तोपर्यंत हा केळीवाला पसार झाला होता.नवपुते यांनी सिडको पोलिस ठाणे गाठत या प्रकाराची माहिती असलेले निवेदन आणि व्हिडिओ क्लिप पोलिसांना सादर करीत कारवाईची मागणी केली आहे. मनविसेचे कार्तिक फरकाडे यांनी देखील याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी मनसे विभाग अध्यक्ष चंदू नवपुते यांनी प्रकरणाचा पोलिसांत पाठपुरावा केला. याची दखल घेत सिडको पोलिसांनी या प्रकरणात केळी विक्रेता अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख (वय ६०, रा. सवेरा पार्क, जहांगीर कॉलनी) याच्यावर भारतीय न्याय संहिता २७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. केळी विक्रेता अब्दुल पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पीएसआय म्हस्के याप्रकरणी तपास करीत आहेत.

काय आहे कलम २७४

अन्न किंवा पेय हानिकारक बनवता येईल या उद्देशाने त्यात भेसळ करणे किंवा तशी कृती करणे. अशा खाद्यान्नाचा किंवा पेयाचा विक्री करण्याचा हेतू ठेवणे, अशा व्यक्तीस एकतर सहा महिन्यांचा कारावास किंवा पाच हजारांचा दंड किंवा दोन्ही शिक्षांची कलम २७४ मध्ये तरतूद आहे.

नवरात्रीच्या उपवासाच्या काळात फळांना मोठी मागणी असते. परंतु, फळविक्रेते अशा पद्धतीने जर किळसवाणे प्रकार करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी यावर कारवाई करावी अन्यथा, अशा विक्रेत्यांना मनसे स्टाइलने समज देण्यात येईल.

- चंदू नवपुते, मनसे, विभाग अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.