पाचोड/विहामांडवा (जि.औरंगाबाद) : बचत गटाची (Self Help Group) वसुली जमा करुन पैठणला (Paithan) निघालेल्या कर्मचाऱ्याचा तिघा जणांनी पाठलाग करून त्याची दुचाकी आडवून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास बेदम मारहाण करुन अंदाजे पावणे दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता.११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तुळजापूर-विहामांडवा (ता.पैठण) (Paithan) रस्त्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण येथील भारत फायनान्स कंपनीच्या (Bharat Finance Company) वतीने महिला बचत गटांना सक्षमीकरणा करिता कर्ज वाटप केलेले आहे. नेहमी प्रमाणे त्या कर्जाच्या हप्त्याची वसुली जमा करण्यासाठी फायनान्स कर्मचारी इम्रान लियाकत सय्यद (वय २१, रा.खडकी कोळघर, ता.गेवराई जि.बीड) हा सकाळी विहामांडवा येथे आला. त्याने बचत गटाच्या खातेदाराकडून रक्कम जमा करुन आपल्या नवीन दुचाकीवरुन विहामांडव्याहून - तुळजापूरमार्गे पैठणकडे जाण्यासाठी निघाला.
दरम्यान साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रस्त्यावरील डाव्या कालव्यानजीक येताच पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या दुचाकीवरील रुमालाने तोंड झाकलेल्या तिघा जणांनी त्या कर्मचाऱ्याची दुचाकी अडविली व काही समजण्यापूर्वीच त्याच्या डोक्यात लाल मिरचीने भरलेली बिअरची बाटली फोडली व त्यास जबर मारहाण करुन त्याच्याकडील बॅगेत ठेवलेले एक लाख ऐंशी हजार रुपये व काही महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून ते पसार झाले. लुटारुंनी केलेल्या या हल्ल्यात कर्मचारी इम्रान सय्यद हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळला. दरम्यान टाकळी अंबड येथील राजेंद्र वाकडे हे गावी जाण्यासाठी आपल्या कारने जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला व त्यानी कार थांबवून या घटनेची कल्पना जवळपासच्या ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी लुटारुंचा पाठलाग करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शहागडच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलिस कर्मचारी अप्पासाहेब माळी, पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे, पोलिस बीट अंमलदार सुधीर ओव्हळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. भरदिवसा ही लुटमारीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पाचोड येथील रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.