सामान्यांचे बाबा, सरपंच ते औरंगाबादचे खासदार रामकृष्ण पाटील यांचा जीवनप्रवास

Ramkrushna Baba Patil1
Ramkrushna Baba Patil1
Updated on

वैजापूर (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता.दोन) सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या जन्मदिनीच निधन झाले. आमच्या गावच वैभव असणाऱ्या आणि सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या धार्मिक राजकीय वादळाला भावपूर्ण श्रद्धांजली. बाबांचा जन्म दोन सप्टेंबर १९३६ रोजी मातोश्री सोनुबाई व वडील जगन्नाथराव यांच्या पोटी झाला. बाबांचं बालपणची परिस्थिती ही मध्यम स्वरूपाची होती. आईवडील हे शेती करून उदरनिर्वाह करीत होते आणि बाबांचे शिक्षण करत होते. त्या काळी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बाबांची बुद्धिमत्ता ही अफाट होती.

लहानपणापासूनच जिद्दी, मेहनती आणि संघटन कौशल्य यात प्रवीण होते. मित्र जमा करणे, गावातील मंदिरात जाऊन पूजापाठ करणे, गोरगरिबांच्या मदतीला धाऊन जाणे हे बाबांना कोणी न शिकवता अवगत होते. लहानपणापासूनच जनार्दन स्वामींची सोबत लाभल्यामुळे त्यांना धार्मिक कार्याची आणि जनसेवेची आवड होती. त्यांच्यातील हेच गुण हेरून दहेगावाने वर्ष १९६९ साली सरपंचपद देऊन खऱ्या अर्थानं एका सामाजिक रोपाची लागवड केली आणि पुढे तेच रोपटे या समाजाला तारणार, दिशा देणारे एक वटवृक्ष झाल्याचे उभ्या जगाने पाहिले. सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर गावात अनेक विकासकामे केली आणि येथूनच बाबा परिसरात प्रचलित झाले. बाबांचा विवाह हा गावातीलच उगले कुटुंबातील नामदेवराव उगले यांची कन्या आसराबाई उगले यांच्याशी झाला.

म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचा हात असतो. ही उक्ती या जोडप्याला मात्र जास्तच उठून दिसते. कारण बाबांना बाबा हे नाव जनतेने दिलं तसेच त्यांची धर्मपत्नी असलेल्या आसराबाई यांना आक्का हे नाव देऊन या जोडप्याला अजरामर केलं. आक्कांनी बाबांना त्यांच्या सुख दुःखात हसतखेळत संपूर्ण साथ दिली. गेली ४० वर्ष भागवत ग्रंथाचं वाचन बाबा नियमीत करत होते. बाबांकडे सरपंचपदा बरोबरच १९७० ला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्षपद आल. आता बाबांचा राजकीय आलेख हा उंचावत होता.१९७६ ला बाबा पंचायत समितीचे सभापती झाले.बाबांकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांचा ओढा जरा जास्तच वाढला होता.जसा बाबांचा स्वभाव तसाच आक्‍कांचा ही होता. येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करून त्यांना चहा पाणी, जेवण ई व्यवस्था स्वतः लक्ष देऊन करत होत्या. देशात आणि राज्यात त्या काळात पूर्णतः काँग्रेसचे सरकार होते. बाबाही काँग्रेसच्या विचाराने प्रभावित होऊन लोकांची कामे ही स्वखर्चाने तालुकास्तरावर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करत होते. विनायकराव आण्णा यांच्या विचारांचे समर्थ वारसा लाभलेले बाबांच्या हातून तालुक्यात आता अनेक विकासकामे होऊ लागली.

१९८० ला बाबा विनायक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बाबांकडे जास्त प्राधान्य होते. म्हणुन १९८७ ला सहकारी संस्था स्थापन करून वैजापूर तालुक्यातील १८ हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना आणून तब्बल २५ ते ३० गावांना पाणी उपलब्ध करून दिले.१९७६ ला बाबा पहिल्यांदा जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून गेले. १९७० ते १९८० हा काळ बाबांच्या राजकीय कारकीर्दीचा पाया समजला जातो. कारण एक हाती पंचायत समिती सभापती, विनायक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जिल्हा बँक अशी अनेक पदे त्यांच्या हाती होती.

त्यांच्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने पुढे १९८५ ला बाबांना पहिल्यांदा आमदारकीची संधी दिली आणि बाबांनी पुढे ती दहा वर्षे समर्थपणे पेलली. तत्कालीन नेते बाबुराव काळे, माणिकराव पालोडकर, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांची सोबत असलेले बाबा हे शेवटपर्यंत निर्व्यसनीच होते. आणि त्यांच्या निर्भीड स्पष्ट वक्तेपणा, साधी राहणी या गुणामुळे ते सोनिया गांधी यांचे खास विश्वासू होते. बाबांनी राजकारण हे फक्त समाजासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीच केलं.

कारण ते नेहमी धार्मिक आणि समाजकारणात बांधील असायचे. त्यांचं वारकरी सांप्रदाय आणि संत महंत यांच्यात एक वेगळ स्थान होत. न भूतो न भविष्यती घडत असलेला सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरीनाम सप्ताह हा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात बाबांचा वाटा सर्वांना माहीत आहे. नारायणगिरी महाराजांसोबत बाबांचं एक वेगळं नातं होत. महाराज आक्काणा बहीण मानत होते. बाबांची मात्र ते नेहमी मस्करीच करत आणि बाबांना कार्य करण्याची एक ऊर्जा देत. महाराजांनी थकलेले असतानाही बाबांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. अन्नदान असेल कुणाच्या मुलामुलींच्या लग्नाला उपस्थित राहून बाबांनी स्वतः हातभार लावला. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या बाबांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना मात्र नेहमी साधारण राहण्याचेच संस्कार केले.

बाबांचं कुटुंब हे सर्वसाधारण आहे. त्यांना दोन मुली व तीन मुले व नातू असा मोठा परिवार. मोठे चिरंजीव आप्पासाहेब पाटील हे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय समितीचे सदस्य तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी भूषण पुरस्कारचे मानकरी आहेत. दादासाहेब पाटील हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहीले होते. पुढे त्यांचे अपघाती निधन झाले आणि बाबांच्या जीवनात आलेला हा सर्वात मोठा आघात ठरला. त्यांचे लहान चिरंजीव काकासाहेब पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषद दोन वेळेस सदस्य राहिले. स्नुषा वैशालीताई पाटील या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. बाबांच्या विचारांवरच पाऊल ठेऊन हे सर्व कुटुंब जनसेवेचं कार्य करत आहे. त्यांनी मुलांची लग्नं मात्र साध्या पद्धतीने केली.

स्वतः आप्पासाहेब पाटील यांचं लग्न वर्षानुवर्ष चालत असलेल्या त्यांच्या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला. १९९७ ला जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर बाबा हे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात एक वजनदार नेते होते. शेतकऱ्यांच्या आशा आता आणखी पल्लवीत झाल्या होत्या. पण दुर्दैवाने १ मताने केंद्रातील सरकार पडले आणि फेरनिवडणुका झाल्या. काँग्रेस नेतृत्वाने औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवार बदलून दिला. त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागले आणि जनतेची सेवा करणारा माणूसही राजकारणापासून दुरवला. बाबांनी शेतीला पहिल्यापासून प्राधान्य दिलं होत. २००० ला दादासाहेब पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे बाबा अत्यंत हतबल झाले.

पण त्यांनी स्वतः ला व कुटुंबाला या धक्क्यातून अगदी शांततेने सावरलं. पुढे राजकारणातून दूर राहून ज्ञानेश्वरी ,भागवत आदी ग्रंथ कथा कीर्तन यात रमत. परंतु बाबांना पुनः पुन्हा राजकारणात आणून जन्सेवेचीच संधी दिली. गावातील अनेक मंदिरांची बांधकाम बाबांनी स्वखर्चातून केली. पंढरपूर येथील गंगागिरी महाराज यांच्या मठाच काम ही मोठ्या प्रमाणात निधी देऊन केलं. आळंदी येथील मठाची जागा स्वतः घेऊन दान केली.आळंदीला नारायणगिरी महाराजांना मठाच्या जागेचा झालेला त्रास बाबांनी स्वतः कायदेशीर रीत्या सोडवला. अनेक तरुणांना शिक्षणाला ,लग्नाला ,नोकरीला मदत केली. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना असेल, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प दहेगाव असेल असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले, अशा या आमच्या सामान्यपण देदीप्यमान ,अनेकांना सत्मार्गाला लावणाऱ्या या असामान्य नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना कंठ दाटून येतो.

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.