body buried in salt locked house Samata Colony Possibility of human sacrifice crime news
body buried in salt locked house Samata Colony Possibility of human sacrifice crime newssakal

Human sacrifice : कुलूपबंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह!

वाळूजमधील समता कॉलनी कामगार वसाहतीत प्रकार उघडकीस; मृतदेहावर शेंदूर लावलेले दगड अन् लिंबू; नरबळीची शक्यता
Published on

वाळूज : वाळूजमधील समता कॉलनी कामगार वसाहतीतील एका कुलूपबंद घरात मिठामध्ये पुरलेला मृतदेह बुधवारी आढळून आला. हे घर मागील तीन महिन्यांपूर्वी भाडेकरू बाहेरगावी जात असल्याचे सांगून गेल्यानंतर कुलूपबंद होते. मात्र, नवीन भाडेकरू आल्यामुळे घरमालकाने घराचे कुलूप तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहावर शाल टाकून शेंदूर लावलेले दोन दगड व काही लिंबू ठेवलेले होते. त्यामुळे, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तपासानंतरच खरा प्रकार उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी; येथील समता कॉलनी कामगार वसाहतीत एस. जी. शेळके हे कामगार वास्तव्यास आहेत. २० मे २०२२ पासून त्यांच्याकडे फुलंब्री तालुक्यातील धानोरा गावातील काकासाहेब भुईगळ (वय ६०) हे रूम भाड्याने घेऊन राहत होते. एक अंदाजे २० वर्षीय दिव्यांग मुलगी व दुसरी १३ वर्षीय अशा दोन मुली व पत्नी असे चौघेजण भाड्याने घेतलेल्या रूममध्ये वास्तव्यास होते. भुईगळ हे पूजाअर्चा व मांत्रिकाचे काम करीत असत. घरमालक शेळके हे त्यांच्या आजारी वडिलांमुळे बहुतेक वेळा शेवगाव तालुक्यातील वाघोली या गावीच असतात. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवादरम्यान सप्टेंबरमध्ये भाडेकरू भुईगळ यांनी कुटुंबासह गावाकडे जात असल्याचे घरमालक शेळके यांना सांगितले. त्यानंतर खोलीला कुलूप लावून भुईगळ कुटुंबासह निघून गेले. यादरम्यान घरमालक शेळके हे भाड्याच्या पैशासाठी भुईगळ यांच्याकडे मोबाइलवर तगादा करीत होते. तेव्हा लवकरच देतो, असे भुईगळ याच्याकडून सांगितले जायचे.

दोन दिवसांपूर्वीही शेळके यांनी भुईगळकडे थकीत भाड्याची मागणी केली. मात्र, त्यांनी मोबाइल घेतला नाही. १४ डिसेंबररोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरमालक शेळके यांच्याकडे नवीन भाडेकरू खोली भाड्याने मागण्यासाठी आला. त्यामुळे कुलूपबंद असलेल्या भुईगळच्या ताब्यातील खोलीचे कुलूप तोडून घरमालक शेळके आत शिरले. तेव्हा आत कुठलेही संसारोपयोगी साहित्य त्यांना दिसले नाही. तसेच प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यांनी स्वयंपाकघरातील ओट्याच्या खालील भागाची पाहणी केली, तेव्हा त्यांना खालचा अर्धा भाग सिमेंट व वाळूने बंद केल्याचे दिसून आले. त्यावर दोन शेंदूर लावलेले दगड व काही लिंबू ठेवलेले आढळले. त्यांनी सिमेंटने बंद केलेला भाग फावड्याने फोडला असता त्यात मिठामध्ये पुरलेला कपड्यांमध्ये गुंडाळलेला कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने ही माहिती वाळूज पोलिसांना दिली.

पोलिस पथक घटनास्थळी
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप शेळके, सखाराम दिलवाले, जमादार सचिन राजपूत, गणेश लक्कस यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ठसेतज्ज्ञ सहायक पोलिस निरीक्षक आर.ए.शेख, अमोल सुखधाने यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रमेश आरगडे, विकास वाहूळ यांच्या रुग्णवाहिकेतून घाटीत हलविला. घटनास्थळावर काही पुरावे आढळतात का, यासाठी घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले आहेत. वाळूज पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाअंती मृतदेहाची ओळख पटविण्यात तसेच प्रकार उघडकीस आणण्यात लवकरच यशस्वी होऊ, असा आशावाद पोलिस निरीक्षक इंगोले यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.