औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. दोनदा दिलेली मुदत 15 जानेवारीला संपली. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण दहा हजार वाहनांना फास्टॅग लागले आहेत. ही गती वाहनसंख्येच्या मानाने मंदावल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाने मात्र यात टॉप गिअर टाकला असून 95 टक्के बसला फास्टॅग लावले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरवातीला डिसेंबरपासून टोलनाक्यांवर दुचाकी आणि तीन चाकी सोडून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले होते. त्यानंतर त्याला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोलनाक्यांवर दुप्पट टोल भरावा
लागणार आहे.
काय आहे फास्टॅग?
फास्टॅग म्हणजे वाहनांवर लावण्यासाठीचे रीड होणारे स्टिकर. वाहनासमोरच्या काचेवर लावलेला फास्टॅग टोलनाक्यावरील सेंसर कॅमेरा वाहनाचा फास्टॅग रीड करतो. त्यानंतर वाहनधारकांच्या बॅंक खात्यातून टोलची रक्कम वजा होते. यासाठी टोलनाक्यावर रांगेत उभे राहण्याची गरज उरत नाही.
इथे मिळतो फास्टॅग
फास्टॅगसाठी जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तसेच एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह अन्य बॅंकांनी फ्रेन्चॉयजी घेतलेली आहे. पेटीएम फास्टॅगही उपलब्ध आहे. बॅंकेच्या प्रत्येक शाखेमध्ये फास्टॅगसाठीचे खाते उघडून दिले जात आहे. याशिवाय बॅंकांचे आणि फास्टॅग देणाऱ्या एजन्सीचे एजंट विविध कार्यालयांमध्ये फिरून फास्टॅगसाठी खाते उघडण्यासाठीचा आग्रह धरत आहे.
घरपोच मिळतो
कारसारख्या वाहनांच्या खातेदाराला साधारण पाचशे ते सातशे रुपये आकारणी केली जात आहे. त्यामध्ये 200 रुपये डिपॉझिट, 200 रुपयांचा रिचार्ज आणि शंभर रुपये ऍक्टिव्हेशन चार्जेस आहेत. ही रक्कम बॅंकानुसार कमी अधिक आहे. बॅंकेकडून अथवा फास्टॅग देणाऱ्या एजन्सीकडून वाहनधारकाला घरपोच फास्टॅग पाठवला जात आहे.
नो फास्टॅग नो फिटनेस
औरंगाबाद जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे फिटनेस तपासणीसाठी येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्टॅग लावल्याशिवाय फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही. असे असले तरीही नवीन खरेदी केलेल्या वाहनांना वाहनाच्या डीलरमार्फतच फास्टॅग लावून वाहन दिले जात आहे.
काय आहे परिस्थिती
औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने सहा महिन्यांपासून नोंदणी आणि फिटनेस तपासणीसाठीच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. दररोज आरटीओ कार्यालयात शंभर वाहने फिटसेनसाठी येतात, त्यातील तीन चाकी वगळून साधारण पाच हजार नवीन वाहनांनी फास्टॅग लावून घेतले आहे. जिल्ह्यात एकूण 12 लाख वाहने आहेत. त्यामध्ये जुन्या फास्टॅग अपेक्षित असलेल्या कार संवर्गातील वाहनांची संख्या 25 हजारांच्या जवळपास आहे. त्यातील अंदाजे चार हजारांच्या जवळपास फास्टॅग लावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटीचा पुढाकार
एसटीच्या औरंगाबाद विभागाने सर्वच एसटी बसला फास्टॅग लावण्याचे काम सुरू केले आहे. विभागाच्या औरंगाबाद क्र. 1, औरंगाबाद क्र.2, पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव अशा सात आगारांत एकूण सहाशेच्या जवळपास एसटी बस आहेत. त्यापैकी 518 एसटी बसला फास्टॅग लावण्यात आले आहेत.
जागृतीचा अभाव
चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य केला असला तरीही खासगी वाहनधारक अद्यापही जागरूक नाहीत. मुळात महामार्गावर जाण्याची वेळ येत नाही, तोपर्यंत खासगी वाहनधारक माहीत असूनही फास्टॅग बसवण्यासाठी पुढकार घेत नाहीत. सध्या महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच रांग असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. याउलट फास्टॅग असलेली वाहने अन्य रांगेतून सुसाटपणे निघून जात असल्याचे चित्र आहे.
फास्टॅग लावण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, केंद्र शासनाने ऍक्टिव्हेशनसाठी 15 जानेवारी तारीख दिली होती. यामुळे पारदर्शकता येते, इंधनाची बचत होते, प्रदूषण कमी होते, रांगेत थांबण्याच्या कटकटीतून मुक्तता होते. त्यामुळे प्रत्येक चारचाकी वाहनधारकाने फास्टॅग लावून घेतला पाहिजे.
-संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.