औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारी (ता. सहा) सुरूवात झाली. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरच्या यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते यंत्राचे पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला पहिल्या टप्प्यातील काम देण्यात आले आहे. जीव्हीपीआर कंपनीने नक्षत्रवाडी येथे कारखाना उभारून त्यामध्ये मुख्य जलवाहिनीसाठी लागणाऱ्या पाईप निर्मितीचे काम सुरू केले. मात्र, कोरोनामुळे तांत्रिक कर्मचारी आणण्यास अडचण आल्यामुळे पाईप तयार करण्याला उशीर झाला. त्यातच स्टिलचे भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने कंत्राटदार कंपनीने भाववाढ द्यावी, अशी मागणी केली. पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कंत्राटदार कंपनीला तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. तरी देखील कामाला गती मिळत नव्हती. शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनल्यानंतर भाजपने शहरात जलआक्रोश मोर्चा काढला होता. यानंतर शहराचा पाणीप्रश्न राज्यपातळीवर पोचला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यासोबतच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावादेखील त्यांनी घेतला. कंत्राटदार कंपनीकडून कामात निष्काळजीपणा होत असल्याचे निदर्शनास येताच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या, अन्यथा कंत्राटदारावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे जीव्हीपीआर कंपनीने तातडीने कामाची गती वाढवून पाईपची निर्मिती २४ तास सुरु केली आहे.
उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते यंत्राचे पूजन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अधिकारी, पीएमसीचे अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून त्यामध्ये पाईप टाकले जात असल्याचे जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले.
‘थर्ड पार्टी’ तपासणी
जीव्हीपीआर कंपनीने साडेसात मीटर लांब आणि साडेआठ मीटर व्यासाचे पाईप तयार केले आहेत. जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत पाईपची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोटिंगचे काम हाती घेण्यात आले. कोटिंगची देखील त्रयस्थ संस्थेने तपासणी करून एजन्सीने अहवाल दिल्यानंतरच मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सुरूवात झाली आहे.
पाणी योजनेसाठी जायकवाडीत बांधकामास मान्यता
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामास सोमवारी (ता.५) मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. यामुळे बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेल्या १६८० कोटी योजनेला गती येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक आज ‘वर्षा’वर झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर, तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जायकवाडी पाणी पुरवठा योजनेच्या जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात उद्भव विहीर व पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी, असे सांगितले. सिल्लोडच्या नॅशनल सहकारी सूतगिरणीची विशेष बाब म्हणून शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.