खैरेंच्या दाव्याचा समाचार केद्रीय मंत्री भागवत कराड यांनी घेतला असून ‘तुम चाहे कितना भी किचड उछालो, मै कमल की तरह खिलता रहूंगा,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
औरंगाबाद: ‘मी रावसाहेब दानवे आणि भागवत कराडांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. मी काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेलो होतो; पण या दोघांनाही भेटलो नाही. भागवत कराडांना मीच नगरसेवक आणि महापौर केले होते. कराड हे राजकारणात मला खूप ज्युनिअर आहेत. त्यामुळे ते मला येऊन भेटतील, त्यावेळेस मी त्यांचे अभिनंदन करेन. आम्ही एकत्र असतानाही रावसाहेब दानवेंनी लोकसभेच्या वेळेस दगाबाजी करत स्वतःच्या जावयाला माझ्याविरोधात उभे केले होते, अशी फटकेबाजी माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी केली. दरम्यान, खैरेंच्या या दाव्याचा समाचार केद्रीय मंत्री भागवत कराड यांनी घेतला असून ‘तुम चाहे कितना भी किचड उछालो, मै कमल की तरह खिलता रहूंगा,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
‘ई सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला झालेल्या पराभव रावसाहेब दानवे यांच्या दगाबाजीमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. 'युती असतानाही दानवेंनी अनेक नगरसेवक फोडले तसेच पैशांचा वापर करून दानवेंनी माझ्या विरोधात छुपा प्रचार केला होता,' असा थेट आरोप केला. औरंगाबादेत जातीयवादी राजकारणामुळे इथला विकास खुंटला आहे का? या प्रश्नावर खैरे म्हणाले की, मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो होतो त्यावेळेपासून २०१८ पर्यंत शहरात एकही दंगल झाली नव्हती. २०१८ ला एक दंगल झाली होती. ती एमआयएमने केली होती. शहरात शिवसेनेचं एवढं वर्चस्व होतं की, आम्ही शहरात कुठंही तणाव निर्माण होऊ दिला नव्हता. आता एमआयएम आल्याने औरंगाबादचे वातावरण दूषित झाले आहे.
'यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजन नव्हते,' असा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांच्यावर नितीन गडकरी यांच्या भेटीचा संदर्भ देऊन केला होता. त्यावर खैरे म्हणाले की, गडकरी असं म्हणूच शकत नाहीत. इम्तियाज जलील खोटं बोलत आहेत. युती सरकारच्या काळात मी आणि गडकरींनी राज्यात मोठी विकासकामे केली आहेत. गडकरी केंद्रात मंत्री असताना त्यांनी मला बरीच मदत केली आहे. आम्ही मिळून मराठवाड्यातील रस्त्यांसाठी झटलो आहे. मराठवाड्यात रेल्वेचं जाळं मजबूत होण्यासाठी मी प्रयत्न केले.
शिवसेनेतील गटबाजीच्या प्रश्नावर खैरे म्हणाले की मी आता शिवसैनिक नसून शिवसेनेचा नेता आहे. पक्षात नेतेपद हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे पद आहे. इथं आमच्या काही लोकांना याचं महत्त्व कळत नाही. इथं औरंगाबादेत काही लोकांना 'घर की मुर्गी दाल बराबर' असं वाटते. औरंगाबादमध्ये गटबाजी करणाऱ्यांवर पक्षप्रमुख एकेदिवशी असा घाव टाकतील की त्यादिवशी ते सगळे ठीक होतील. मी इथं गटबाजी होऊ देणार नाही. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे सुरू असून इथं पुन्हा शिवसेनाच सत्तेवर येणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीत भाजप सोबत नसल्याचा फटका आम्हाला बसणार नाही, उलट त्याचा आम्हाला फायदाच होईल, असे श्री खैरे म्हणाले. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी आपण एकत्र निवडणुका लढवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत आम्ही एकत्र असू. कॉँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत ते म्हणाले की, कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. बरेच नेते कार्यकर्त्यांना उत्साह येण्यासाठी स्वबळाची भाषा बोलत असतात.
आपण २०२४ च्या लोकसभेची तयारी करत आहेत का, या प्रश्नावर खैरे म्हणाले की पराभवानंतरही मी मतदारसंघात फिरून जनतेची कामे करत आहे. आगामी लोकसभा उमेदवारीबाबत अंतिम निर्णय शिवसेनाप्रमुख देतील. पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आम्ही पाळू. मी पडल्यानंतर औरंगाबादकरांनी सहानुभूती व्यक्त करत विधानसभेला आम्हाला चांगला पाठिंबा देत आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून दिल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.