Uncleaned Water : दूषित पाण्याचे काहीतरी करा! झालर क्षेत्रातील गावांची समस्या

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील सुमारे ३५ गावांसाठी सिडकोने झालर विकास आराखडा तयार केला.
chhatrapati sambhajinagar municipal corporation
chhatrapati sambhajinagar municipal corporationsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - महापालिका हद्दीलगत म्हणजेच सिडकोच्या झालर क्षेत्रातील ३५ ग्रामपंचायतींच्या स्वच्छता, पाणी व ड्रेनेजच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. सहा) बोलविण्यात आलेल्या बैठकीत नारेगाव येथील जुन्या कचराडेपोचा व झाल्टा फाटा येथील एसटीपी प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यावर आक्षेप घेण्यात आला.

बायोमायिंग प्रक्रिया करून नारेगाव येथील कचरा लवकरच संपविला जाईल तर झाल्टा फाटा येथील एसटीपीच्या दूषित पाण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन महापालिकेतर्फे यावेळी देण्यात आले.

शहर परिसरातील सुमारे ३५ गावांसाठी सिडकोने झालर विकास आराखडा तयार केला. ही गावे शहर परिसरातील असल्याने तेथील स्वच्छता, पाणी व ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणींसह शहर परिसरातील पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. हे पर्यटक शहर परिसरातील गावे जाता-येता बघतात. त्यामुळे गावे स्वच्छ कसे राहतील याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मांडकीच्या सरपंचाने नारेगाव येथील कचरा डेपोचा तर झाल्टा येथील सरपंचाने ड्रेनेच्या दूषित पाण्याचा प्रश्‍न उपस्थित केला.

झाल्टाफाटा येथे महापालिकेला मलजल प्रक्रिया प्रकल्प आहे. त्यातून दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे परिसरातील बोअर, विहिरींची पाणी दूषित होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर प्रशासकांनी स्वतः लक्ष घालतो, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी नारेगाव येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वाहुळे यांच्यासह जल जीवन मिशनचे प्रभारी संचालक राजेंद्र देसले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्यासह ३५ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

अनेक गावांना मिळणार पाणी

शहरासाठी सध्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचे काम करण्यात आले आहे. त्यासोबतच १७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, ही योजना पूर्ण झाल्यानंतर ९०० मिलिमीटर व्यासाच्या योजनेतून शहर परिसरातील गावांना पाणीपुरवठा होणार आहे, असे जी. श्रीकांत यांनी नमूद केले. त्यावर काही सरपंचांनी गावातील जलकुंभाची कामे रखडल्याचे नमूद केले.

...तर करावा लागणार सामंजस्य करार

जी. श्रीकांत यांनी सांगितले, महापालिकेने शहर परिसरात कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी या प्रकल्पावर ओला व सुका असा वेगवेगळा कचरा दिल्यास महापालिकेतर्फे त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. महापालिकेने शहरात ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटे प्रकल्प उभारले आहेत. त्याप्रमाणेच ग्रामपंचायतींनीही असे प्रकल्प उभारण्याची तयारी दाखविल्यास महापालिका मदत करण्यास तयार त्यासाठी सामंजस्य करार करावा लागेल, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.