छत्रपती संभाजीनगर - ग्राहकांनी बुक केलेले रो-हाऊस चार वर्षांनंतरही पूर्णत्वास आलेले नसल्याने रो-हाऊसधारक आणि बिल्डर यांच्यात तू-तू-मै-मै झाली. या वादातूनच बिल्डरने १० ते १५ गुंडांकरवी रो-हाऊसधारकांवर घरात घुसून, घरातील वीजपुरवठा बंद करत प्राणघातक हल्ला चढविला. लाकडी दांडे, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत घरात दिसेल त्यांची डोकी फोडण्यात आली. विशेष म्हणजे, गुंडांनी यामध्ये महिला, चिमुकल्यांनाही सोडले नाही. एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याचे अक्षरशः डोके फोडले. ही घटना पाटोदा शिवारातील पेरे चौकाजवळील शांतीनगर रेसिडेन्सीत २ ऑक्टोबरच्या रात्री घटना घडली, अशी माहिती सातारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
दरम्यान, मारहाणीमुळे रो-हाऊसधारक प्रचंड भेदरले असून पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी आर्त साद घालत त्यांनी सातारा पोलिस ठाण्यासमोर ३ ऑक्टोबररोजी गर्दी केली होती. रोहित बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक बाळू दशरथ मोघे, त्याचे चार भाऊ आणि इतर १० ते १५ जण यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः अर्जुन राजेंद्र एरंडे (वय २६) हा फिर्यादी आहे. त्यांच्यासह अन्य कुटुंबीयांनी पाटोदा येथील पेरे चौकाजवळील गंगापूर नेहरी शिवारात गट क्र.३३ मध्ये रोहित बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक बाळू मोघेकडून रो-हाऊस बुक केलेले आहेत. २०१९ मध्ये बुक केलेले
रो-हाऊस अजूनही पूर्णत्वास आलेले नाहीत. कोणाचे पाठीमागील प्लास्टर बाकी आहे तर कोणाच्या गच्चीवरील पॅराफिट वॉल बांधकामच केलेले नाही. कोरोनाचे कारण देऊन मोघेने लोकांकडून पैसे घेतले आणि त्यांना अनेक वर्षे घर दिले नाही. एकीकडे कर्जाचा हप्ता आणि दुसरीकडे घरभाडे सुरू असल्याने वैतागलेल्या ग्राहकांनी अर्धवट रो-हाऊस ताब्यात घेऊन आहे त्या परिस्थितीत तेथे राहायला सुरुवात केली. त्यानंतर रो हाऊसधारक ग्राहकांनी बिल्डर मोघेंकडे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला.
मागील चार वर्षांपासून त्यांची मागणी सातत्याने सुरूच होती. मात्र, मोघे प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन काम करण्यास टाळाटाळ करीत होता, असा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.
चौघा भावांसह गुंडांना घेऊन आला
दोन ऑक्टोबरला बिल्डर बाळू मोघे साइटवर आला तेव्हा तेथील रहिवाशांनी त्याला गाठून काम कधी पूर्ण करता, अशी विचारणा केली होती. तसेच होणार नसेल तर आमचे पैसे परत करा, असे म्हणून त्याला धारेवर धरले होते. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन तो तेथून निघून गेला खरा, मात्र रात्री ८ वाजता तो, त्याचे चार भाऊ आणि दहा ते पंधरा गुंडांना घेऊन पुन्हा आला. प्रत्येकाच्या हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडे होते. त्यांनी येताच दिसेल त्याचे डोकी फोडायला सुरुवात केली. दुपारी मला एकट्याला पाहून सगळ्यांनी वाद घातला आता,
तुम्हाला जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्यांनी अर्जुन राजेंद्र एरंडे, राजेंद्र एरंडे, शाम ज्ञानेश्वर डाके (९ वर्षे), सुरेश यादव निकाळजे, हिराबाई जाधव, प्रशांत पावडे, तुकाराम शंकर कुऱ्हे, आशाबाई राजेंद्र एरंडे, लक्ष्मीबाई सुरेश निकाळजे, अंजनाबाई शंकर कुऱ्हे यांना जखमी केले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर शाम डाके या चिमुकल्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याचे वडील ज्ञानेश्वर डाके यांनी सांगितले.
८० ते ९० टक्के पैसे घेऊनही काम अपूर्णच
बाळू मोघे याने जवळपास ८० ते ९० टक्के पैसे घेतले मात्र, काम पूर्ण केलेले नाही. आताही तो पैसे द्या, मग काम करतो, अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुळात त्याने काम पूर्ण करून शेवटचा हप्ता मागायला पाहिजे. कारण, आमचा त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही. उर्वरित पैसे घेऊन जर त्याने काम केले नाही तर काय करायचे?, या भीतीने अनेकजण आता पैसे देत नाहीत. अशात त्याने रो-हाऊसचे कनेक्शन ड्रेनेजलाइनला जोडले नाही. त्यामुळे महिला, मुलांसह येथील रहिवाशांना लाखो रुपये मोजूनही प्रातर्विधीसाठी उघड्यावर जावे लागते, अशी व्यथा नागरिकांनी मांडली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.