छत्रपती संभाजीनगर - शहराची लोकसंख्या एकीकडे वेगाने वाढत असताना महापालिकेचा आरोग्य विभाग रिक्त पदांमुळे जर्जर झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसह तब्बल शंभरहून अधिक पदे रिक्त आहेत. शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तीन सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय झाला, पण आवश्यक यंत्रणा देण्यास शासनाने नकार दिल्यामुळे दोन हॉस्पिटलचा प्रस्ताव गुंडाळावा लागला.
शहरातील सुमारे १७ लाख नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागावर आहे. सर्वसामान्य नागरिक ताप, सर्दी, खोकला असे साथीचे आजार होताच महापालिकेचा दवाखाना गाठतात. मात्र, महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त झाली आहेत. त्यासोबत कायम कर्मचाऱ्यांची वानवा आहे. १० आरोग्य अधिकारी व कर्मचारी अशी १०० पेक्षा जास्त पदे सध्या रिक्त आहेत.
त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे. महापालिकेची शहरात ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यात ‘आपला दवाखाना’ व ‘आरोग्यवर्धिनी’ची भर पडली असून, अशी १२ केंद्रे नव्याने सुरू झाली आहेत. असे असले तरी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या अपुरी आहे. महापालिकेचा मोठा दवाखाना नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयावर ताण पडतो.
त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून तीन ठिकाणी सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागाही अंतिम झाल्या, पण आवश्यक मनुष्यबळ देण्यास शासनाने नकार दिल्यामुळे सिडको एन-८ भागात केवळ एकच सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय झाला. कोविड काळात राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून चिकलठाणा एमआयडीसी भागात कोविड हॉस्पिटल सुरू केले. याठिकाणी छोट्या-छोट्या शस्त्रक्रिया करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला होता, पण अद्याप हे शस्त्रक्रियागृह सुरू झालेले नाही.
दोनशे खाटांची नुसतीच चर्चा
महापालिकेचा मोठा दवाखाना सुरू करण्यासाठी दहा वर्षांपासून नुसतीच चर्चा सुरू आहे. तत्कालीन महापौर तथा विद्यमान केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महापालिकेतर्फे २०० खाटांचा दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली होती पण ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही.
प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. त्यानुसार आवश्यक औषधीसाठा महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहे. ऑक्सिजनची सुविधा, एआरव्ही, साथीच्या आजाराच्या अनुषंगाने औषधी, यंत्रसामग्री आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनीमुळे सर्वसामान्य घरातील रुग्णांना आधार मिळत आहे.
डॉ. पारस मंडलेचा,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.