छत्रपती संभाजीनगर - तांत्रिक अडचणींमुळे शहराचा पाणीपुरवठा सध्या वारंवार विस्कळित होत असला तरी आगामी उन्हाळ्यात शहराला पाणी टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आणखी नऊ जलकुंभ महापालिकेला डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे शहरातील पाणी साठवण क्षमता वाढून गॅप कमी होईल. नवीन जलकुंभाच्या परिसरात पाइपलाइन टाकून त्यावर नळजोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. कंत्राटदारामार्फत आतापर्यंत मुख्य जलवाहिनीचे २० किलोमीटरचे काम झाले असून, धरणात जॅकवेलच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यासोबतच ३५ जलकुंभांची कामे सुरू आहेत. त्यापैकी ११ जलकुंभ डिसेंबरअखेर पूर्ण करून महापालिकेच्या ताब्यात देण्याचे नियोजन आहे.
यातील हनुमान टेकडी व टीव्ही सेंटर भागातील जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित नऊ जलकुंभाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास येईल. टप्प्या-टप्प्याने हे जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात दिले जातील. या जलकुंभाच्या परिसरात पाइपलाइन टाकून त्यावर नळकनेक्शन दिले जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
त्यासोबतच जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या नव्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचे ३० किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवी ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी डिसेंबरअखेरपर्यंत महापालिकेला वापरता येईल. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहराला काहीसा दिलासा मिळणार आहे.
अडीच लाख नळांना बसणार मीटर
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या नळ कनेक्शनला वॉटरमीटर बसविले जाणार आहे. वॉटरमीटरसाठी ऑक्टोबरमध्ये स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही निविदा अंतिम करून वॉटर मीटरची खरेदी केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.