छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २९ उमेदवार असून, त्यात १६ मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असली, तरी प्रचारातून महायुतीचाच बोलबाला दिसून येत आहे.
महायुतीकडून भाजपचे उमेदवार अतुल सावे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून, डोअर टू डोअर ते मतदारांच्या भेटी घेत आहेत.
पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमकडून इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहुजी शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी आणि बसपाच्या शीतल बनसोडे यादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, प्रचारात अतुल सावे यांना मतदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दहा वर्षांपासून एमआयएम या मतदारसंघात आपले भाग्य आजमावत आहे.
मात्र, दोन्हीवेळा भाजपने त्यांना मात दिली आहे. यावेळीदेखील मतदारसंघात भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. यासह भाजपचे नेते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे आणि प्रवीण दरेकर यांनीदेखील पत्रकार परिषदा घेतल्या आहेत; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
एमआयएमसाठी असदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतली असली, तरी प्रचारात अद्याप त्यांना गती मिळालेली नाही. मतदारसंघात १६ मुस्लिम उमेदवार असल्यामुळे एमआयएमसमोर मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेसकडून लहू शेवाळे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे पांडुरंग तांगडे पाटील यांनी नाराज होऊन एबी फॉर्म भरल्याचे सांगितले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फुलंब्रीतून उभे असलेले उमेदवार विलास औताडे यांच्यासाठी सभा घेतली.
मात्र, पूर्व मतदारसंघात शेवाळे यांच्यासाठी नियोजित असलेली सभा रद्द केली.काँग्रेससाठी केवळ अमित देशमुख यांनी सभा झाली आहे. मविआचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी पूर्वमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे म्हटले होते. परंतु, तरीदेखील उमेदवारासाठी त्यांनी सभा घेतल्याने, पूर्वमध्ये आघाडी धर्म पाळला जात नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान भाजपचे अतुल सावे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
पूर्व मतदारसंघातील एकूण मतदार : ३ लाख ५२ हजार ३१३
पुरुष मतदार : १ लाख ८२ हजार ५२७
महिला मतदार : १ लाख ६९ हजार ७७२
#ElectionWithSaka
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.