Chhatrapati Sambhaji Nagar Clashes: एक भांडण अन् दोन तास जाळपोळ

Chhatrapati Sambhaji Nagar Clashes
Chhatrapati Sambhaji Nagar ClashesSakal Digital
Updated on

छत्रपती संभाजीनगर येथे किराडपुरा भागात राममंदिर परिसरात दोन गटात झालेल्या वादामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. CM एकनाथ शिंदेंपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार इम्तियाज जलील यांनी हात जोडून शांततेचे आवाहन केलं. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी हा वाद नेमका घडला तरी का, पोलिसांनी यावर काय म्हटलंय, एकूण नुकसान किती झालंय? याचा ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा...

वाद नेमका काय?

सुरुवातीला राममंदिराजवळ वाहनाचा धक्का लागल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. काही क्षणात वाद चिघळला आणि परिसरात दंगल उसळली. पोलिसांचे पथक तिथे पोहोचलेही होते. मात्र, अतिरिक्त पोलीस तुकडी तिथे पोहोचेपर्यंत जमाव  आक्रमक झाला होता. जमावाने पोलिसांना, सरकारी वाहनांना लक्ष्य केले. रात्री साडे अकरा ते पहाटे पावणे पाच पर्यंत परिसरात हा प्रकार सुरू होता.

Chhatrapati Sambhaji Nagar Clashes
Maharashtra Politics : छ. संभाजीनगर येथील राड्याचे मास्टरमाइंड फडणवीसच; ठाकरे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

२० पोलीस अधिकारी जखमी

जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्त अपर्णा गीते (मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, उस्मानपुरा पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सिटी चौकचे सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे, सिटी चौक आरपीसी अंमलदार शाम साळवे, सिडको आरसीपीचे अंमलदार दीपक हिवाळे, दीपक गडवे, उस्मानपुरा पोलिस नाईक प्रमोद बऱ्हाटे, नियंत्रण कक्ष ‘आरसीपी’ पथकाचे हवालदार एजाज अहेमद, सय्यद कलीम, अंकुश डांगे, शाम पवार, जिन्सी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पठाण, कॉन्स्टेबल सय्यद फहीम, ईसाक धांडे, सहायक फौजदार कुतूर आदींचा समावेश आहे. पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्सही फेकल्या होत्या, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकारी मालमत्तेचे नुकसान

पोलिसांची १४ वाहने आणि वाहनांतील शस्त्रास्त्रे जाळपोळीत खाक झाली. पोलिसांच्या वाहनांचे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी समाजकंटक लाठ्या-काठ्या, दगड, विटा घेऊन आले होते. पथदिव्यांचेही नुकसान झाले, तर सुरक्षित शहरांतर्गत मंदिरासमोर लावलेले सीसीटीव्हीचे पाच लाख रुपये किमतीचे युनिटही समाजकंटकांनी जाळले. तथापि, त्याआधीपर्यंतचे दगडफेक, जाळपोळ करणारे बहुतांश समाजकंटक सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात विटा, दगडांचा खच पडला होता.

Chhatrapati Sambhaji Nagar Clashes
Sandipan Bhumre : "ज्यांनी गाड्या जाळल्या..." ; छ. संभाजीनगरमधील राड्यानंतर पालकमंत्र्यांचा इशारा!

पोलिसांचे म्हणणे काय?

रात्री अकरा ते साडेअकरादरम्यान काही तरुणांत किरकोळ भांडण झाले. दोन्ही बाजूंचे चार- चार तरुण होते. नंतर काही तरुण निघून गेले. त्यानंतर मात्र गर्दी गोळा झाली, त्या गर्दीला पोलिसांनी पांगविले. तासाभराने मोठ्या संख्येने जमाव जमला आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बऱ्यापैकी नियंत्रणात आणले, मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने त्यांना पांगवता आले नाही. नंतर आपण स्वतः डीसीपींसह अतिरिक्त फोर्स जाऊन घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविला. साधारण एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.

परिस्थिती नियंत्रणात असून मंदिर परिसरासह हद्दीत शांतता आहे. परिसरात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी एक हजार ते १२०० पोलिस तैनात आहेत.  सर्वांनी शांतता राखून पोलिस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केलं आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Police
Chhatrapati Sambhaji Nagar PoliceSakal Digital

दंगलीसह इतर कलमांनुसार गुन्हे
दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या चारशे ते पाचशे समाजकंटकाविरोधात कलम ३०७, ३५३, २९५, ३३२, ३३३, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, १५१, १५२, १५३ या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


छत्रपती संभाजीनगरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता आहे. परंतु, भडकावणारी स्टेटमेंट देऊन परिस्थिती अजून चिघळली पाहिजे, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. मला एवढेच म्हणायचे आहे, की त्यांनी अशा परिस्थितीत कसे वागले पाहिजे हेदेखील समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. कुणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नये. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सगळ्याच नेत्यांनी आहे. कुणी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काही नाही. शहरात शांतता राहिली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. मी माहिती घेतली असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. यात सर्वांनी शांतता राखली पाहिजे. पोलिस आपले काम करीत आहेत. सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने सण साजरे करीत आले आहेत. कायदा- सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले?

किराडपुरा घटनेनंतर काही जण आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, ही वेळ एकमेकांवर चिखलफेक करण्याची नव्हे तर हातात हात घेऊन, एका सुरात शांततेसाठी काम करण्याची आहे. आपले शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होत आहे, ते आणखी पुढे कसे जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhaji Nagar Clashes
Chhatrapati Sambhaji Nagar ClashesSakal Digital

सामाजिक सलोख्याने रामनवमी साजरी
शहरात किराडपुरा भागातील जाळपोळीच्या घटनेनंतर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने रामनवमी महोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींनी दिवसभरात राममंदिराला भेटी दिल्या. सर्वांनीच शांततेचे आवाहन केले. त्यानंतर निघालेल्या रथयात्रेत मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.