छत्रपती संभाजीनगर - परदेशातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा सायकल चालवण्याची संस्कृती आहे. ही संस्कृती आपल्या शहरामध्ये रुजावी यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सायकल ट्रॅक उभारले. परंतु, या सायकल ट्रॅकच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला.
यातच प्रशासनाने केलेली धरसोड व सायकल ट्रॅककडे केलेले दुर्लक्ष आणि सायकल प्रेमींकडून प्रशासनावर दबाव न टाकल्याने शहरातील सायकल संस्कृतीचा प्रयोग फसला. वर्षभरात उभारण्यात आलेले सायकल ट्रॅकवर वाहने धावू लागल्याचे चित्र आहे.
अगोदर नागरिक छंद म्हणून सायकल चालवायचे. परंतु, कोरोनानंतर व्यायाम म्हणून सायकल चालवत आहेत. यासाठी शहरात सायकल ट्रॅक असावे, अशी सायकल संघटनेची वतीने महापालिकेला मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शहराच्या विविध भागातून मुख्य रस्त्याच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्याचे नियोजन झाले.
यात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत जवळपास ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यातून रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, प्रोझोन मॉल ते गरवारे स्टेडियम या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यातही आले. मात्र, वर्षभरातच या ट्रॅकची बिकट अवस्था झाली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेले पोल तुटून पडले आहेत. सुरुवातीपासूनच व्यापाऱ्यांनी या सायकल ट्रॅकला विरोध केला होता.
यात प्रशासनासोबत नागरिकांची उदासीनता दिसून आली. यामुळे प्रशासनाने शहरातील सायकल ट्रॅकचा प्रस्ताव गुंडाळला असून, आता या ट्रॅकवर अनधिकृतपणे पार्किंग व मोठ्या व दुचाकी वाहने धावत आहेत. शहरात रोज पहाटे चारशेहून अधिक नागरिक सायकल चालवतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या अधिक आहे.
या ठिकाणी हवेत सायकल ट्रॅक
जालना रोड.
जळगाव रोड.
रेल्वे स्टेशन.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा.
असे होते प्रस्तावित सायकल ट्रॅक
सिडको ते हर्सूल टी पॉइंट
हर्सूल टी पॉइंट ते दिल्लीगेट
दिल्ली गेट ते बीबी का मकबरा
हॉटेल ताज ते सेव्हन हिल
रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक
हव्या या सुविधा
मुख्य वाहनाच्या दुतर्फा सुरक्षित सायकल ट्रॅक.
सायकल उभी करण्यासाठी सायकल स्टॅँड.
प्लॅस्टिक, फायबर पोलच्या ऐवजी सिमेंटचे व उंच खांब बसवावे.
महापालिकेच्या वतीने सुरुवातीला सायकल ट्रॅक उभारण्यात आले. याचे आम्ही सर्व जणांनी स्वागतही केले. मात्र, महापालिकेला नंतर ते टिकविता आले नाही. सायकल ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ती दुरुस्त करावी व कायमस्वरूपी असलेले सायकल ट्रॅक उभारावे.
- डॉ. प्रशांत महाले, संचालक, सायकलिस्ट फाउंडेशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.