छत्रपती संभाजीनगर - वर्ग एकचा अधिकारी असलेल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नात लाखो रुपये खर्च करत त्याच्या वडीलांनी थाटामाटात लग्न लावले. ‘तिने’ही मुलाकडील पैशांचा अंदाज घेतला. एक दिवस तिचा भाऊ, आई आले अन् त्याच्या घरातून रोकडसह २३ लाखांचे ४० तोळे दागिने घेऊन पळाले! विशेष म्हणजे एवढे सगळे होऊनही मुलाच्या वडिलांनी सुनेसह तिच्या आईला दागिने तुम्हाला राहू द्या, असे म्हणत वारंवार परत येण्याविषयी विनंती केली.
मात्र, मुलीसह तिच्या आईने आम्ही फसविण्यासाठीच बनावट लग्न लावले आहे, आम्ही परत येऊ शकत नाही, असे ठामपणे सांगितल्यानंतर अखेर मुलाच्या वडीलांनी सातारा पोलिसांत धाव घेतली. त्यावरून सून, तिची आई, तिचा भाऊ अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
दीपिका नत्थुराम जांगडा (२६) असे ‘नवविवाहिते’चे तर तिची आई सुशीला नत्थूराम जांगडा (४७), आणि भाऊ दिपक (रा. तिघेही सिवानी गाव, जि. भिवानी, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी नरेश सत्यनारायण शर्मा (५१, रा. बीड बायपास परिसर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नरेश यांचे टाईल्सचे शोरुम आहे. त्यांचा मुलगा पुणे मेट्रोमध्ये वर्ग एक पदावर नोकरी करतो. त्याचे लग्न नोव्हेंबर २०२२ मध्ये दीपिकासोबत झाले होते. लग्नानंतर ती केवळ दोनच महिने सासरी (सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) राहिली.
मार्च २०२३ मध्ये आरोपी दीपिकाचा भाऊ दिपक, आई सुशीला हे दोघे छत्रपती संभाजीनगरातील तिच्या सासरी आले. त्यांनी सासरच्या मंडळींच्या परस्पर घरातील ५० हजारांची रोकड, सोन्याचा राणीहार, फॅन्सी नथ, एअर रिंग, दोन अंगठ्या, दोन बांगड्या, तीन नेकलेस, चैन, असे तब्बल ४० तोळे दागिने घेऊन पळाले.
मुलाचा संसार मोडू नका हो!
फिर्यादी शर्मा यांनी सुनेसह तिच्या आईला फोनवर संपर्क केला आणि ‘तुम्ही नेलेले दागिने तुम्हालाच राहू द्या, मात्र माझ्या मुलाचा संसार मोडू नका’ अशी विनंती करत सुनेला परत सासरी येण्याचे सांगितले. त्यावर तिच्या आईने आम्ही परत येणार नाही, ‘फसवणूक करणे हाच आमचा धंदा आहे, त्यामुळे तुम्ही आमचा नाद सोडून द्या’ असे बजावले. त्यानंतर मात्र नाईलाज झाल्याने फिर्यादीने सून, तिची आई, तिचा भाऊ या तिघांविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल केला.
बनावट लग्नाच्या टोळीची पाळेमुळे कुठपर्यंत?
मोठमोठी घरंदाज मंडळी पाहून लग्नासाठी जांगडा कुटुंबीय लोकांची फसवणूक करतात. ही एक मोठी टोळीच कार्यरत आहे. विशेष म्हणजे, दिपीका हिचे लग्न लावल्यानंतर तिची आई सुशीला ही मुलीला, ‘गर्भधारणा होऊ देऊ नको’, योग्य वेळ आली की आपण पैसा घेऊन फरार व्हायचे, असे स्पष्टपणे सांगत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे आपले घराणे सुशिक्षित वाटावे म्हणून म्हणून आरोपी दिपीका आणि तिचा भाऊ हे दोघेही आपण एका शाळेवर शिक्षक असल्याचेही सांगतात. बनावट लग्न करणाऱ्या या गॅंगची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत हे शोधणे सातारा पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे हे करत आहेत.
मेहुण्याच्या माध्यमातून जमले होते लग्न
फिर्यादी शर्मा यांचा एक मेहुणा हरियाणामध्ये राहतो. त्याला दिपीकाच्या लग्नाच्या स्थळाची माहिती मिळाली होती. मात्र हे फसवणूक करणारी गॅंग असावी हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याने जवळचा नातेवाईक, त्यातही तो वर्ग एकचा अधिकारी म्हणून काम करतो. त्याचे चांगले होईल या आशेने दिपीकाचे स्थळ शर्मांच्या मुलासाठी आणले होते.
मात्र, सर्व उलटेच झाल्याचे समोर आले आहे. हरियाणातील स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपी जांगडा कुटूंबाविरोधात गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध सध्या सातारा पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.