पोषण आहार योजनेचा हिशेब ठेवताना गुरुजींच्याच डोक्याची ‘खिचडी’
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची तीन संरचित आहार पद्धत सुरू झाली आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी मुलांना देण्याचे नियोजन आहे. मात्र, या नियोजनाचा हिशेब ठेवताना गुरुजींच्याच डोक्याची ‘खिचडी’ होत आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने मेन्यूचे प्रकार ठरवून दिले आहेत. प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक व मुख्याध्यापकांना दिले आहे. यातून मुलांना पोषण आहार मिळत असला, तरी हा मेन्यू आता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून योजनेत वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला, तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ या सर्वांचा हिशेब शिक्षकांना ठेवावा लागत आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे हा हिशेब ठेवावा कसा? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
अग्रिम स्वरूपात रक्कम द्यावी
या पोषण आहारानुसार विद्यार्थ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवारी वाटाणा मसाला भात आणि दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी सोयाबीन वडी द्यायची आहे. परंतु अद्यापपर्यंत शाळांना शासनाकडून किंवा संबंधित ठेकेदाराकडून सोयाबीनच मिळालेली नाही. तसेच खीर बनविण्यासाठी साखर किंवा गूळ, दूध पावडर, नाचणीसत्त्व या पदार्थांचाही पुरवठा झालेला नाही. दरम्यान, या सर्व वस्तू संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी खरेदी करायच्या असून त्याचे पैसे नंतर मिळणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र ज्या शाळांचा पट मोठा आहे, त्या शाळांतील मुख्याध्यापकांना एवढे साहित्य आणण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या समस्येवर काय उपाययोजना करावी? असा प्रश्न शाळांना पडला आहे. शासनाने अग्रिम स्वरूपात ही रक्कम द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने केली आहे.
हिशेबाबद्दल नाही मार्गदर्शन
शालेय पोषण आहारासाठी शिक्षकांना दररोज ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती भरावी लागते. त्या उपस्थितीनुसार महिन्याच्या अखेरीस प्रत्येक पदार्थांचा ग्रॅमप्रमाणे हिशेब द्यावा लागतो. हा हिशेब कसा द्यायचा? याचे सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना मिळाले नाही. तसेच दररोजची माहिती भरताना काही दिवसांमध्ये नेमका कोणता मेन्यू टाकायचा यामध्येही शंका आहे. त्यामुळे ही माहिती भरताना महिन्याच्या अखेरीस शिक्षकांच्या डोक्याची खिचडी होत आहे, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.
असा आहे पोषण आहाराचा मेन्यू
पोषण आहारामध्ये भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, वरण-भात, तांदळाची खीर, नाचणी सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे. यानुसार विद्यार्थ्यांना सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवशी तांदळाची खीर, शनिवारी नाचणी सत्त्वाची खीर, बुधवारी अंडी आणि अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी अथवा उपलब्ध फळे, बुधवार वगळता इतर दिवशी मोड आलेल्या कडधान्याची उसळ द्यायची आहे. पहिला आठवडा झाला की दुसऱ्या आठवड्यातील मेन्यूमध्ये बदल असून त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येही बदल केले आहेत.
दररोज येणारी नवनवीन परिपत्रके, भराव्या लागणाऱ्या लिंक, वेगवेगळ्या समित्यांचे इतिवृत्तांत आणि विविध उपक्रमांमुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच भर म्हणून ऑगस्टपासून नवीन पाककृतीनुसार पोषण आहार द्यावा लागत आहे. त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचे नवीन प्रमाणानुसार हिशेब ठेवण्याचे काम जिकरीचे आणि वेळखाऊ आहे. त्यात मुलांना शिकवायचे कधी? त्यामुळे शासनाने जुनीच पोषण आहार योजना सुरू ठेवावी.
— विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.