Sambhaji Nagar : उद्योजक-पोलिसांत राखणार समन्वय;‘मसिआ’च्या वाळूज येथील कार्यालयात संयुक्त बैठक

काही दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नामांकित उद्योजकाचा खंडणीसाठी अपहरण करण्याचा कट उघडकीस आला. यामुळे सध्या उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नामांकित उद्योजकाचा खंडणीसाठी अपहरण करण्याचा कट उघडकीस आला. यामुळे सध्या उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या अनुषंगाने सोमवारी (ता. २४) मसिआ, औद्योगिक संघटना आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मसिआच्या वाळूज कार्यालयात संयुक्त बैठक झाली. यापुढे उद्योजक आणि पोलिस प्रशासनाने एकत्र कार्य करण्यासाठी रोड मॅप या बैठकीत ठरविण्यात आला.

बैठकीला पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक) नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, डी.जी. मुळीकर, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, सीआयआयचे अध्यक्ष सुनील किर्दक, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पटेल, लघू उद्योगाच्या भारती वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसांपासून वाळूज औद्योगिक परिसरात लुटमारी, चोरी, शस्त्राचा धाक दाखवून उद्योजकांना लुटणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे उद्योजकात प्रचंड भीती, दहशत पसरली आहे. अशा घटना वारंवार आणि मुख्य म्हणजे दिवसादेखील घडत आहेत. त्यामुळे मसिआ आणि इतर संघटनांनी अशा घटना घडू नयेत; तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे काय उपाययोजना केलेल्या आहेत, याची माहिती देण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला उद्योजक अनिल पाटील, अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, राजेंद्र चौधरी, रमाकांत पुलकुंडवार, सर्जेराव साळुंके, सुरेश खिल्लारे, कमलाकर पाटील, राहुल मोगले, दुष्यंत आठवले, प्रल्हाद गायकवाड, अभिषेक मोदाणी, अजय गांधी, मंगेश निटूरकर, नितीन तोष्णीवाल, मिलिंद कंक, संजय भाताडे, पंकज लोया, दत्तात्रय बेदाडे, अंगिरस जोशी, मनोज कंक, अशोक जगधने, अभिमन्यू पाटील, प्रमोद नागरे, सुमंत गोले, गणेश सरोवर, अभिजित पठाडे, राजश्री कुलकर्णी, संतोष राऊत, संदीप पाटील, मनोज शिरसाठ, एच.बी. लड्डा यांच्यासह एकूण ७३ उद्योजकांची उपस्थिती होती.

वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या खंडणी, नशेखोरी, लूटमार, अतिक्रमण, अवैध टपऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्री उद्योजक, कर्मचारी, कामगार यांना धमकावणे, त्यांच्याकडील पैसे, मोबाइल अशा वस्तू हिसकावणे, वर्गणीच्या नावाखाली पैसे मागणे, खोट्या तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल करणे असेही प्रकार होत आहेत.

— चेतन राऊत, अध्यक्ष, मसिआ

उद्योजकांनी त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, तर तक्रार करावी; कारण बऱ्याचवेळेला उद्योजक घडलेला प्रकार सांगत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे तक्रार दाखल केली, तर आम्हाला कारवाई करणे सोपे होते.

— कृष्णा शिंदे, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी

अशा घटना रोखण्यासाठी पोलिस सदैव तत्पर आहेत. काही अनुचित प्रकार घडला, तर त्याची तक्रार नोंदवावी. सर्व उद्योजकांनी सीसीटीव्ही बसवावेत, कोणतेही कर्मचारी, कामगार यांना कामावर घेताना त्यांची कागदपत्रे तपासून घ्या. रात्री पोलिसांची गस्त वाढवू. उद्योजकांनी सतर्क राहावे, निर्भीड बनावे, एकत्र असावे.

— नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.