औरंगाबाद: शहरात तलवारींसह तब्बल ४९ शस्त्रांचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच गरमपाणी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सहा तलवारींसह एक गुप्ती व कुकरी असा सुमारे सहा हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई ५ जुलै रोजी सायंकाळी करण्यात आली. प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून एकजण पसार आहे. शेख इर्शाद ऊर्फ ईशू शेख सईद (२५, रा. गरमपाणी, मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तर शेख जाकेर शेख यते समोद्दीन (२४) असे पसार आरोपीचे नाव आहे.
सोमवारी (ता.पाच) दुपारी पाचच्या सुमारास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख इर्शाद ऊर्फ ईशू हा अवैधरीत्या शस्त्रांचा साठा बाळगून आहे. याआधारे धोंडे हे पथकासह शेख ईर्शाद याचा शोध घेत असताना इर्शाद हा मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेल समोर उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला पकडून त्याची चौकशी केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखवताच आरोपीने शस्त्रसाठा त्याचा मित्र शेख जाकेर याच्या घरी ठेवल्याचे कबूल केले.
आरोपी घरी सापडला नाही, वडिलांसमोर घेतली झडती
पथकाने आरोपी शेख जाकेर याच्या घरावर छापा मारला; मात्र पोलिसांना आरोपी घरी सापडला नाही. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांसमक्ष घर झडती घेतली असता, स्वयंपाकघरातील पोटमाळ्यावर पोलिसांना गोणीत सहा तलवारी व एक गुप्ती आणि कुकरी सापडली. प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून मंगळवारी (ता.सहा) न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यावर आरोपी शेख सईद याला नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी मंगळवारी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.