Chhatrapati Sambhajinagar News : ‘ड्रेनेज’च्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; नातेवाइकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

ड्रेनेजच्या चेंबर लाइनमध्ये पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. दोन) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक ५६ परिसरात घडली.
Nagesh Gaikwad
Nagesh Gaikwadsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ड्रेनेजच्या चेंबर लाइनमध्ये पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. दोन) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक ५६ परिसरात घडली. नागेश नवनाथ गायकवाड (रा. मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. नागेशच्या नातेवाइकांनी महापालिका, कंत्राटदाराला जबाबदार धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक ५६ परिसरातील विमानतळाच्या भिंतीलगत ड्रेनेजलाइन आहे. तिथे नागेश शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्या ठिकाणी ड्रेनेजच्या चेंबर लाइन दुरुस्तीसाठी महापालिकेने मोठा खड्डा केला. ड्रेनेजचे पाणी वर आल्याने शेळी हाकताना नागेशला खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यावर पाय पडताच नागेश थेट ड्रेनेजलाइनमध्ये पडला. हा खड्डा १८ ते २० फूट खोल होता. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता.

नागेश खड्ड्यात पडल्याची घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तासाभरात नागेशला बाहेर काढले. पण, त्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

कायदा काय सांगतो?

यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठातील कायदेतज्ज्ञ ॲड. अभयसिंह भोसले यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, महापालिका अभियंता, वॉर्ड अधिकारी, साइटवर नेमलेली व्यक्ती (कर्मचारी), इतकेच नव्हे तर ही जबाबदारी महापालिका आयुक्तांचीही आहे. एखादी व्यक्ती आली आणि खड्ड्यात पडली, असा सरळ-सरळ अपघात नाही. घटनास्थळी दर्शनी भागात फलक असायला हवा होता. परंतु, हा कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

मनपानेच खोदला खड्डा

विमानतळाच्या भिंतीलगत जुना एसटीपी प्लांट आहे. त्यासाठी ४५० मिलिमीटर व्यासाची मुख्य पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. ही पाइपलाइन अनेक महिन्यांपासून फुटलेली असून, महापालिकेने भिंतीलगतच मोठा खड्डा खोदला आहे. त्यातून दिवस-रात्र पाणी वाहात आहे. या खड्ड्यात पडून नागेश नवनाथ गायकवाड (वय २१) याचा बळी गेला.

आई-वडिलांचा आधार गेला

नागेशला आई-वडील आणि एक भाऊ आहे. त्याच्या वृद्ध वडिलांना आता काम होत नाही. त्यामुळे नागेश हा शेळ्या हाकून, प्रसंगी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत असे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांचा आधार गेला.

घाटीत संताप अन् आक्रोश

नागेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. महापालिका, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला होता. जोपर्यंत महापालिका, कंत्राटदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नागेशच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी घेतली होती. सायंकाळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घाटीत धाव घेत कारवाईचे आश्वासन दिले. पण, रात्री उशिरापर्यंत नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही.

घटनेला जबाबदार कोण?

या ठिकाणी असलेल्या खड्ड्याची सूचना देण्यासाठी महापालिकेने काहीही उपाय केलेला नव्हता. माहितीफलक किंवा चौकोन करून खड्डा बंदिस्त करणे आवश्यक होते, तसेही केलेले नव्हते. त्यामुळे याला महापालिका की कंत्राटदार, यापैकी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा अपघात नसून महापालिकेने माझ्या लेकराची केलेली हत्या आहे. संबंधित ठेकेदार, अभियंता, महापालिका प्रशासन यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

- नवनाथ गायकवाड, मृत नागेशचे वडील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.