Dengue Fever: जलजन्य व कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने यंदादेखील जय्यत तयारी केली आहे. ॲबेटिंग, फॉगिंग, धूर फवारणीसह पावसाच्या साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहेत.
‘गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा’ असे आवाहन दरवर्षी प्रशासनातर्फे केले जाते. मात्र, गप्पी मासे नेमके काय करतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. डास चावल्याने डेंगीचे रुग्ण झपाट्याने वाढतात. गप्पी मासे साचलेल्या पाण्यातील डास-अळ्या खातात. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबते व डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मदत होते.
शहरातील सुमारे पाच टक्के लोकांना कीटकांपासून आजार उद्भवतात, असे मानले जाते. विशेषतः पावसाळ्यात डेंगी, मलेरियासारख्या आजाराची साथ पसरते. त्यामुळे प्रशासनातर्फे दरवर्षी ‘कोरडा दिवस पाळा’, ‘गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा’ असे आवाहन केले जाते. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले, गप्पी मासे साचलेल्या पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने घरातील डास कमी होतात.
बाजारातील रासायनिक उत्पादके घेण्यापेक्षा हा स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. गप्पी माशांना ऑक्सिजन युनिटची गरज नसते. त्यांचा आहार इतर माशांपेक्षा कमी असतो. गप्पी मासे अंडी न घालता पिल्ले देतात. त्यामुळे त्यांचा जगण्याचा दर जास्त असतो. प्रत्येक प्रभागनिहाय्य गप्पी मासे पैदास केंद्र असून, नागरिकांनी मागणी केल्यानंतर व मलेरिया विभागाचे कर्मचारी स्वतः पाहणी करून साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडतात, असे अर्चना राणे यांनी नमूद केले.
शहरात जुलै महिन्यात डेंगीचे दोन बाधित तर तीन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
साथरोग व कीटकजन्यच्या दृष्टीने यंदा केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात १७० वसाहती संवेदनशील आढळल्या आहेत. या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे, असेही डॉ. अर्चना राणे यांनी नमूद केले.
घरातून संध्याकाळी बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, फुल स्लीव्हचा शर्ट किंवा कुर्ता, लांब पँट, मोजे आणि बूट घालावे, चप्पल किंवा सँडल घालणे टाळावे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रात्री मच्छरदाणीमध्ये झोपण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे फक्त डासच नाही तर अन्य किड्यांपासूनही संरक्षण होते.
अळ्या असलेल्या पाण्यात काही गप्पी मासे सोडा. हे मासे लार्वा खाऊन टाकतील.
पाण्याची स्वच्छता राखा आणि नियमितपणे पाण्याचे निरीक्षण करा. गप्पी मासे अळ्या खातात, परंतु पाणी स्वच्छ ठेवण्याचे इतर उपाय देखील करा.
पाण्याची नियमित देखभाल करा, पाण्याचा प्रवाह चांगला ठेवा आणि अनावश्यक वस्तूंची साठवण टाळा.
घराच्या आजूबाजूला अनावश्यक पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या.
ड्रेनेजलाइन आणि गटार साफ ठेवा. पाण्याच्या कंटेनरला झाकून ठेवा.
गप्पी मासे नसतील तर पाण्यात थोडं तेल टाका, अळ्या वर येणार नाहीत.
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंगीचे रुग्ण आढळले नसले तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. ताप, डोके व अंगदुखी होत असेल तर तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.