छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने नुकतीच १२३ पदांची नोकर भरती केली. त्यातील ८५ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या, पण, गेली सहा महिन्यांत १२ जणांनी महापालिकेची कायम नोकरी नाकारली आहे.
महापालिकेत नव्या आकृतिबंधानुसार सुमारे एक हजारांपेक्षा जास्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, मात्र आस्थापना खर्चाच्या मर्यादेमुळे शासनाकडून मंजुरी घेऊन टप्प्याटप्प्याने नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. प्रशासनाने मार्च २०२४ मध्ये शासन नियुक्त खासगी एजन्सीमार्फत नोकर भरती प्रक्रिया राबवून ८५ जणांना नियुक्ती दिली होती, ही कायम नोकरी असताना अनेक तरुणांचे मन त्यात लागत नसल्याचे दिसून येत आहे.
दोन-चार महिने नोकरी केल्यानंतरही अनेकांनी इतर ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळताच, महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत १२ जणांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता, अग्निशमन विभाग, यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता, इमारत निरीक्षक, लेखा विभागातील अधिकारी तसेच लिपिकांचा समावेश आहे.
दरम्यान, काही कंत्राटी कर्मचारी शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महापालिकेत रुजू होत आहेत. लेखा विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या एक कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाल्यावर कंत्राटी नोकरी सोडून शासनाच्या योजनेनुसार महापालिकेतच नोकरी मिळवली. या कंत्राटी कर्मचाऱ्याला दरमहा १६ हजार रुपये वेतन मिळत होते, आता तो १० हजार मानधन घेत आहे. या योजनेतून आज ना उद्या कायम नोकरी मिळेल, अशी अपेक्षा तरुण व्यक्त करत आहेत.
विद्यावेतनावर २४० जण रुजू
राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. त्यात तरुण-तरुणींना ६ ते १० हजारांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. महापालिकेत आतापर्यंत २४० जणांची या योजनेअंतर्गत निवड झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात १०७ जणांचे मानधन जमा झाले आहे, तर सप्टेंबरमध्ये रुजू केलेल्या दीडशे तरुणांना लवकरच मानधन मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.