छत्रपती संभाजीनगर : बोनस हातात पडला, पगारही जमा झाला आणि ग्राहकराजा बाजारपेठेत अवतरला. दिवाळीआधीचा शहरातील बाजारपेठेला अक्षरशः उधाण आले. पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, त्रिमूर्ती चौक यासह शहरातील सर्वच परिसरातील बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. तयार कपड्यांपासून इलेकट्रॉनिक वस्तूंपर्यंत आणि फर्निचरपासून फटाक्यांपर्यंत सर्वच ठिकाणी खरेदीचा अमाप उत्साह बघायला मिळाला. यंदाच्या पाच दिवसांच्या दिवाळीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाजारात किमान ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची आशा आहे.